23.4 C
Latur
Sunday, March 8, 2026
Homeलातूरमहापशुधन एक्स्पो २०२६ मध्ये गुडसूरची 'सोनू' अव्वल

महापशुधन एक्स्पो २०२६ मध्ये गुडसूरची ‘सोनू’ अव्वल

उदगीर : प्रतिनिधी
परळी येथे आयोजित अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन (महापशुधन एक्स्पो २०२६) मध्ये गुडसूर (ता. उदगीर, जि. लातूर) येथील नागनाथ त्र्यंबक शेटकार यांच्या सोनू’ या देवणी गायीने मादी गाय गटात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाबद्दल शेटकार यांचा सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे, आमदार धनजंय मुंडे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी, माफसूचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष प्रविण मुंदडा हे उपस्थित होते.
    साडे पाच वर्षांची सोनू’ ही उत्कृष्ट बांधा, आकर्षक ठेवण आणि उच्च दुधाळ क्षमतेमुळे परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत अव्वल ठरली. विविध पशुपालकांच्या देवणी गायींमध्ये झालेल्या चुरशीच्या स्पर्धेत सोनू’ने सरस कामगिरी करीत गुडसूर गावासह उदगीर तालुक्याचा नावलौकिक वाढविला. सोनू’ची यशस्वी परंपरा यापूर्वीही कायम राहिली आहे. महापशुधन एक्स्पो २०२३, शिर्र्डी येथे तिने अखिल भारतीय स्तरावर चॅम्पियन होण्याचा मान मिळविला होता. तसेच माळेगाव खंडोबा यात्रा, सिद्धेश्वर यात्रा (लातूर), हावगीस्वामी यात्रा (उदगीर) आणि जळकोट येथील पशुपक्षी प्रदर्शनातही तिने सातत्याने पुरस्कार पटकावले आहेत.
    महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने तसेच पशुवैद्यकीय दवाखाना, गुडसूरचे प्रमुख डॉ. मयुरेश हलबुर्गे यांनी वेळोवेळी सोनू’च्या आहार, आरोग्य व पशुवैद्यकीय व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी शेटकार यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले, सहाय्यक आयुक्त डॉ. श्रीधर शिंदे, पंचायत समिती उदगीरचे विस्तार अधिकारी डॉ. विजय कपाळे यांच्यासह गुडसुरचे उपसरपंच बालाजी देमगुंडे, विश्वनाथ मुडपे, अनिल लांजे, विनोबा पाटील, विश्वनाथ होळसंबरे, नवनाथ जगळपुरे, बालाजी कुलकर्णी, इस्माईल पठाण तसेच ग्रामस्थ व पशुवैद्यकीय दवाखान्याचे कर्मचारी संतोष कराड, ज्ञानेश्वर बडे, इंद्रजित सोमवंशी यांनीही सोनू’च्या यशाबद्दल अभिनंदन करून अभिमान व्यक्त केला.  ‘सोनू’च्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे परिसरातील पशुपालकांना प्रेरणा मिळाली असून आधुनिक व शास्त्रीय पशुपालन पद्धतींचा अवलंब करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR