सोलापूर : सोलापूर शहराच्या शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात येत आहे. १ जानेवारी ते १६ जून या साडेपाच महिन्यांत पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी २९ जणांना तडीपार केले आहे. याशिवाय आणखी २५ सराईत गुन्हेगार तडीपारीच्या यादीत आहेत. त्यांच्या वर्तनात बदल न झाल्यास त्यांच्यावरही तडीपारीची कारवाई अटळ आहे.
पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी दीड वर्षात १०० पेक्षा जास्त सराईत गुन्हेगारांना सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विजापूर नाका, सदर बझार, सलगर वस्ती, फौजदार चावडी, जोडभावी पेठ, एमआयडीसी व जेलरोड या सात पोलिस ठाण्यांनी त्यांच्याकडील सराईत गुन्हेगारांची यादी तयार केली आहे. त्यात विशेषत: शरीराविषयक व मालाविषयक गुन्हे करणाऱ्यांचा समावेश आहे. असे दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलिस ठाण्याकडून पोलिस आयुक्तालयाकडे पाठविण्यात येतो.
त्यानंतर सहायक पोलिस आयुक्त त्यासंदर्भात चौकशी करतात आणि त्याचा अहवाल पोलिस उपायुक्तांकडे पाठविला जातो. त्यानुसार पोलिस उपायुक्त त्या सराईत गुन्हेगारावर तडीपारीची कारवाई करतात, अशी ही प्रक्रिया आहे.
आगामी काळात शहरातील तडीपारांच्या यादीत आणखी नावे समाविष्ट होऊ शकतात, तत्पूर्वी त्या सराईत गुन्हेगारांच्या वर्तनात पोलिसांना बदल अपेक्षित आहे. दरम्यान, भैरू वस्तीतील दोन नंबर झोपडपट्टीतील आशितोष उर्फ धीरज अशोक जाधव (वय २५) यास पोलिसांनी तडीपार केले होते, पण त्याने तो आदेश मोडल्याने आता त्याला स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याची रवानगी पुण्यातील येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
सेटलमेंट फ्री कॉलनी क्र. तीनमधील विनोद सिद्राम जाधव (वय ३३) व विजय ऊर्फ सागर सिद्राम जाधव (वय २८) या सख्ख्या भावांना सोलापूर व धाराशिव या जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा व मारामारी करणे, घातक शस्त्रांचा वापर करून मारहाण करणे, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे असे गुन्हे त्या दोघांवर सलगर वस्ती पोलिसांत दाखल होते. त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे.