ठाणे : प्रतिनिधी
राज्यातील जनतेना वेगळ्या गोष्टीमध्ये गुंतवण्याचे काम सुरू आहे. देशात धर्मांची झिंग आली आहे, देवावरची श्रद्धा, धर्माबद्दलचा अभिमान इतके आपण समजू शकतो पण माणसांनी धर्मांध असू नये. आपल्या धर्माचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.
राज ठाकरे म्हणाले की, काही लोक टीव्हीवर येतात आणि जे तोंडाला येते ते लोकांना सांगत असतात. राम आणि रावणाचे जेव्हा युद्ध झाले त्यावेळी रावणाची १ लाख मुलं आणि दीड लाख नातू मारले गेले. मला जितकं माहिती आहे की रावणाला केवळ १० तोंडं होती. एक लाख मुलं होती. काहीही स्टो-या हे लोक सांगत असतात. देश कुठे चालला आहे आणि हे लोक भस्म लावत काय स्टोरी सांगत आहेत.
राज ठाकरे म्हणाले की, २०२१ मध्ये देशातील ज्या परदेशी कंपन्या भारतात आल्या होत्या त्यामधील ५०० कंपन्यांनी देशातील आपले कामकाज बंद केले आहे. यातून किती नोक-या गेल्या याचा अंदाज बांधला पाहिजे, हा केंद्र सरकारचा डेटा आहे, मी तयार केला नाही. देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे.
हिंदू-मुस्लिमांनी काळजी घ्यावी
राज ठाकरे म्हणाले की, आता गणपतीचे दिवस आहेत. या दिवसांमध्ये दंगली घडवल्या जाण्याची शक्यता आहे. देशभरात हेच सुरू आहे, जेणेकरून तुम्ही त्यामध्येच अडकले पाहिजे आणि दुस-या गोष्टीकडे तुमचे लक्ष जाऊ नये. मुंबईत तुम्ही याची झलक पाहिली आहे. माझे मुस्लिम आणि हिंदू दोघांनाही सांगणे आहे की यात पडू नका.
महापुरुषांच्या रांगेत पंतप्रधानांचा फोटो नको
राज ठाकरे म्हणाले की, अमित ठाकरे पुण्यात गेले त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढण्यावरून वाद झाला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या रांगेत दुसरे कोणी बसू शकत नाही. पंतप्रधानांचा फोटो सरकारी कार्यालयात लावला जावा का तर हो पण तो दुस-या भिंतीवर लावला पाहिजे. महापुरुषांच्या रांगेत पंतप्रधानांचा फोटो लावू नये. पण कोणत्या रांगेत कोणाचा फोटो पाहिजे हे सर्वांना कळले पाहिजे. त्यामुळे आताच ही गोष्ट सुधारा.
देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट
राज ठाकरे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी परदेशात जात भारतीयांना सांगितले की परदेशात जाऊ नका, सोनं खरेदी करू नका. देशाचा जीडीपी जर इतर देशापेक्षा जास्त असेल तर परदेशात जायचे का नाही? सोनं खरेदी का करायचे नाही? जेव्हा टंचाई असते तेव्हाच आपण पैसे वाचवतो. आर्थिक परिस्थिती खूप खराब झाली आहे. आज केवळ जेन झी रस्त्यावर आले. उद्या संपूर्ण देश रस्त्यावर येईल. तुम्हाला जातीयवाद, धार्मिक तेढ यामध्ये गुंतवायचे म्हणजे तुम्ही काही दुसरे बोलणार नाही. हे लोक पत्रकारांना बातम्याच देऊ देत नाहीत. म्हणून सोशल मीडियावर लोक व्यक्त होतात.
















