29.9 C
Latur
Tuesday, February 10, 2026
Homeसोलापूरमहापौरपदी सोलापूरचाच  नगरसेवक

महापौरपदी सोलापूरचाच  नगरसेवक

गटनेता व महापौर निवडीबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे मिश्किल वक्तव्य, गोपनीयता कायम

सोलापूर : लवकरच गटनेता आणि महापौर निवडला जाईल. सोलापूरचा चेहरा, सोलापूरचा नागरिक आणि सोलापूरचाच नगरसेवक महापौर होईल, असे मिश्किल उत्तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी दि. 24 जानेवारी रोजी दिले.

गटनेता आणि महापौर निवडीबाबत दि. 24 जानेवारी रोजी बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांना याबाबत माहिती देताना पालकमंत्री गोरे बोलत होते.गटनेता निवडीबाबत चर्चा झालेली आहे. पार्टीच्या सूचना सर्व नगरसेवकांना, नेत्यांना दिल्या आहेत. गटनेत्याची प्रक्रिया काय असेल ती पुढे जाईल.

87 नगरसेवकांमधीलच गट नेता होईल. कोणतीही कसरत करावी लागणार नाही. आमच्याकडे अनेक सक्षम नगरसेवक आहेत. अशा लोकांमधून एकाची निवड होईल. आम्ही सर्वोत्तम गटनेता देण्याचा प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.

भाजपच्या भीतीमुळेच सर्व पक्ष एकत्र

भाजप जिल्ह्यातला मजबूत पक्ष आहे. अनेक लोक, पक्ष अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करत आहेत. त्यामुळे अस्तित्व टिकवण्यासाठी बार्शीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येतायत. मोहोळ तालुक्यातील एकट्याच्या जोरावर भाजपचा प्रभाव करता येत नसल्याचे दिसून आल्याने पाच पक्ष भाजप विरोधात एकत्र आली आहेत.मात्र अनैसर्गिक युती /आघाडी लोक कधीही स्वीकारणार नाहीत. लोक भाजप सोबत राहतील आणि भाजपची जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये आपण बघाल. येणाऱ्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा असेल, असा दावाही पालकमंत्र्यांनी केला.
मात्र महायुतीतील नेत्यांनी काही आचारसंहिता ठेवल्या पाहिजेत. महायुतीच्या बाहेर जाऊन तडजोडी करताना विचार केला पाहिजे, असा सल्लाही पालक मंत्र्यांनी दिला.

घराणेशाहीपेक्षा कार्यकर्त्याचा विचार

एखाद्या नेत्याचा नातेवाईक जर पक्षाचा चांगला कार्यकर्ता असेल, पक्षसंघटनेसाठी वेळ देत असेल, अशा लोकांसाठी आवश्यक तो विचार केला पाहिजे. कुणाचा तरी मुलगा, भाऊ यापेक्षा तो कार्यकर्ता आहे हे विसरून चालणार नाही. परंतु डायरेक्ट अशा काही गोष्टी असतील तर पक्षाच्या संहितेच्या अनुषंगाने आम्ही शक्यतो प्रयत्न करतो. कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका असते असेही पालकमंत्री म्हणाले.

सारस्वत ब्राह्मण समाज मंगल कार्यालयात झालेल्या या बैठकीत आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, मनीष देशमुख आदींसह भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते.

संजय राऊतांची स्वप्न खरी होत नाहीत

अलीकडे संजय राऊत यांना अनेक स्वप्न पडतात. मात्र ती खरी होताना दिसत नाहीत.आता संजय राऊतांवर किती विश्वास ठेवावा हे मीडियाने ठरवावे, असा सल्लाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला.

बुधवारी पुण्यात विभागीय आयुक्तांकडे गटाची नोंदणी

सोलापूर महानगरपालिका भाजप नगरसेवकांच्या आजच्या बैठकीत गटनेता ठरला नाही.
बुधवारी दि. 28 रोजी सर्व नगरसेवक लक्झरी बसने पुण्याला जातील. तिथे विभागीय आयुक्तांसमोर गटाची नोंदणी होईल, सोलापूरचे महापौर, उपमहापौर व गटनेता हे मुंबईतूनच ठरतील, असे सूत्रांकडून समजते आहे .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR