कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी सांबरे (ता. गडहिंग्लज)मध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी एका कार्यक्रमानंतर झालेल्या महाप्रसादातून विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडली. या घटनेत लहान मुले आणि महिलांसह तब्बल २५० हून अधिक नागरिक बाधित झाले असून, त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. या घटनेमुळे संपूर्ण सांबरे परिसरात एकच खळबळ उडाली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, सांबरे गावात शुक्रवारी सकाळी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आजूबाजूच्या १० ते १५ गावांमधील नागरिक सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हा प्रसाद खाल्ल्याने अनेक नागरिकांना दुपारपासून उलट्या, पोटदुखी, मळमळ आणि जुलाब यासारखे त्रास जाणवू लागले. प्राथमिक अंदाजानुसार, विषबाधा झालेल्या नागरिकांची संख्या २५० पेक्षा अधिक आहे. या बाधितांमध्ये लहान मुले, महिला, पुरुष व वृद्धांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने लोक आजारी पडल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. बाधित रुग्णांना तातडीने रुग्णवाहिकांसह मिळेल त्या वाहनांतून वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य केंद्र तसेच उपजिल्हा रुग्णालय आणि खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील अनेक रुग्णांवर तातडीने उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य अधिका-यांनी सांगितले. आरोग्य विभागाने त्वरित गावात पथके पाठवली असून, घरोघरी जाऊन तपासणी सुरू केली आहे.

