लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेतील काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या आशाताई भिसे यांच्या पुढाकारातून लातूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अधिकारी आणि जिल्ह्यातील खासगी ट्रॅव्हल्स वाहतूकदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व आरोग्यासाठी महामार्गांवरील पेट्रोल पंपांवर स्वच्छतागृहांची संख्या वाढवा, अशी मागणी करण्यात आली. या बैठकीला आरटीओ कार्यालयाचे प्रतिनिधी अय्यर यांच्यासह जिल्हा परिषदेतील काँग्रेस पक्षाच्या प्रतोद सोनाली थोरमोटे, सदस्या उषाताई पाटील आणि दीपाली आदमाने यांची प्रमुख उपस्थिती होती. रात्रीच्या वेळी ट्रॅव्हल्सने प्रवास करणा-या महिला प्रवाशांची सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
प्रवासादरम्यान गाडी थांबल्यानंतर महिला प्रवाशांना लघुशंकेसाठी सुरक्षित आणि स्वच्छ जागा मिळणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. अस्वच्छ ठिकाणी जावे लागल्यामुळे फंगल इन्फेक्शन तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) यांसारख्या गंभीर आजारांचा धोका महिलांना संभवतो. केवळ वॉशरुमची सोय उपलब्ध नसते किंवा ते अस्वच्छ असतात म्हणून लातूरवरून पुणे वा इतर शहरांत शिक्षणासाठी जाणा-या अनेक तरुणी व महिला दुपारपासून पाणी पिणे टाळतात, ही गंभीर बाब यावेळी मांडण्यात आली.
या समस्येवर उपाय म्हणून, ट्रॅव्हल्स थांबण्यासाठी निश्चित व सुरक्षित जागा ठरवून देणे गरजेचे असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. महामार्गांवर रात्रंदिवस सुरू असणा-या पेट्रोल पंपांवर महिलांसाठी अतिरिक्त वॉशरुमची संख्या वाढवावी आणि त्यांच्या देखभालीची योग्य सोय केली जावी, असा महत्त्वपूर्ण पर्याय यावेळी पुढे आला. पेट्रोल पंपांचा विषय केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाशी संबंधित असल्याने, हा प्रश्न स्थानिक खासदारांच्या माध्यमातून केंद्राकडे मांडला जाईल आणि महामार्गांवरील पंपांवर पुरेशा प्रमाणात स्वच्छ वॉशरुम उपलब्ध व्हाव्यात यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे गटनेत्या आशाताई भिसे यांनी सांगितले. बैठकीत ट्रॅव्हल्स चालकांनीही आपल्या अडचणी मांडल्या असून, महिलांच्या आरोग्याचा व सुरक्षिततेचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी हा लढा पुढे सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
















