निलंगा : प्रतिनिधी
लातूर-जहीराबाद राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या भीषण धडकेत मसलगा येथील शेतकरी दिलीप गोविंद चामे (वय ४५) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे मसलगा व परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
दि. १० जून रोजी रात्री मसलगा ते मुगाव दरम्यानच्या लातूर-जहीराबाद राष्ट्रीय महामार्गावर दिलीप चामे हे पायी जात असताना भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडकेनंतर काही अंतरापर्यंत त्यांना फरफटत नेण्यात आल्याची माहिती घटनास्थळावरील पाहणीतून समोर आली आहे. अपघातस्थळी वाहनाचा तुटलेला बंपर आढळून आला असून प्राथमिक अंदाजानुसार अपघात टोयोटा कंपनीच्या चारचाकी वाहनाने झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाल्याने संबंधित वाहनाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. घटनेची माहिती मिळताच निलंगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी निलंगा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर ११ जून रोजी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिलीप चामे हे कष्टकरी शेतकरी म्हणून परिचित होते. शेती व्यवसायातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली आणि आई असा परिवार आहे.
कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या आकस्मिक निधनामुळे चामे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून आर्थिक संकटही उभे ठाकले आहे. शेतीसाठी तसेच मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाची जबाबदारी आता कुटुंबासमोर उभी राहिली आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अज्ञात वाहन व चालकाचा शोध घेण्यासाठी निलंगा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
















