28.1 C
Latur
Friday, January 16, 2026
Homeमहाराष्ट्रमहायुतीकडून उमेदवारीसह कोटींचे पॅकेज : राऊतांचा दावा

महायुतीकडून उमेदवारीसह कोटींचे पॅकेज : राऊतांचा दावा

मुंबई : प्रतिनिधी
मुंबई महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी मंगळवारी (३० डिसेंबर) शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मात्र महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपा आणि शिवसेना यांच्यात अनेक ठिकाणी युती झाली नसल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे उमेदवारी न मिळाल्याने इच्छुकांनी दुस-या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीकडून उमेदवारीसह ५ ते १० कोटींचे पॅकेज दिल्याचा दावा केला आहे. तसेच मराठी माणूस यावेळी बंडखोरी प्रवृत्तींना पाठीशी घालणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

तुमच्या पक्षाने किंवा शिवसेना शिंदे गटाने जागावाटप जाहीर केलेले नाही, यामागे नेमके काय कारण आहे. असा प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, गेली अनेक वर्षे अशा याद्या शिवसेनेतर्फे जाहीर केल्या जात नाहीत, हे आपण पाहिले आहे. शिवसेनाप्रमुखांपासून ही प्रथा सुरू आहे. ज्यांना आम्हाला उमेदवारी द्यायची असते, त्यांना एबी फॉर्म दिला जातो. त्यामुळे अर्जांची छाननी झाल्यावर तुम्हाला उद्या कळेलच कोणाला उमेदवारी दिली आहे. कारण उमेदवारी कोणाला दिली, हे काही लपून राहत नाही. याद्या जाहीर करायच्या, मग त्या यादीतून गोंधळ हे प्रकार बहुतेक सर्व पक्षांनी थांबवले आहेत.

उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यावर जी यादी येते, ती फायनल असते. काल संध्याकाळपर्यंत शिवसेना ठाकरे गटाने ज्यांना एबी फॉर्म दिले आहेत, त्या सगळ्यांनी वाजतगाजत आपले अर्ज भरले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांनी सुद्धा उत्साहात अर्ज भरले आहेत. काही ठिकाणी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवारांनी एकत्र जाऊन अर्ज भरले आहेत. बाकी इतर पक्षांत काय गोंधळ चालला आहे, हे आपण पाहिले असेल, असे म्हणत राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला.

संजय राऊत यांनी दावा केला की, महायुती १४ महापालिकांमध्ये तुटलेली आहे. अनेक शहरांमध्ये महायुतीचे लोक एकमेकांच्या छाताडावर बसले आहेत. शिस्तबद्ध वगैरे भाजप पक्ष तिकिट कापतो. नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि ठाण्यात काय गोंधळ झाला. महिलांनी आणि मुलींनी काय गोंधळ केला, हे चित्र पाहण्यासारखे होते. बाहेरून आलेल्या उमेदवारांना आणि गुंडांना उमेदवारी देण्याचे काम अजित पवारांपासून सर्वच पक्षांनी केले. ही लोकशाही आहे, त्यांच्या पक्षाची अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

भाजपा म्हणतेय की आमच्याकडे उमेदवारांची रीघ लागली आहे. या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, बरोबर त्यांच्याकडे गुंडांची रीघ लागली आहे. काल गजा मारणेच्या बायकोला देखील अर्ज दिला आहे. तसेच रीघ लागली आहे ती पैसे घेण्यासाठी, उमेदवारी अर्जाबरोबर जे ५ कोटी रुपये दिले जात आहेत, त्या ५ कोटींसाठी ही रीघ आहे. तसेच शिवसेना शिंदे गटाकडे उमेदवारीसोबत १० कोटी रुपये दिले जात आहेत, असा दावा राऊत यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR