मुंबई : प्रतिनिधी
राज्यात अजित पवार गट, शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता मिळवली असली तरी प्रत्यक्षात त्यांच्यातील अविश्वास आणि राजकीय कुरघोडी आणखी वाढताना दिसतेय. दिल्लीतील हिवाळी अधिवेशनापूर्वी आयोजित सर्वपक्षीय बैठकीने तर हा संघर्ष लोकांसमोर उघडपणे आणला. महत्त्वाची बैठक असतानाही राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेनेच्या प्रमुख चेह-यांनी बैठकीला हजेरी लावली नसल्याने महायुतीत अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, दिल्ली येथील बैठकीस सर्वसाधारणपणे राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे उपस्थित राहतात, तर शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे. मात्र यंदा हे दोघेही न येता त्यांची जागा इतरांनी भरली. त्यामुळे ही नुसती अनुपस्थिती नसून महायुतीतील तणावाची मोठी घंटा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात वाढली आहे.
नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळीही या अस्वस्थतेला खतपाणी घालत आहे. मंगळवारी मतदान तर ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार. पण या निवडणुका महायुतीने एकजुटीत लढवण्याऐवजी तिन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे मैदान गाजवण्याचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे अनेक शहरांमध्ये आणि नगरांमध्ये महायुतीचेच उमेदवार थेट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
कार्यकर्त्यांना पळवून नेणे, गटबाजी, बदनामी, पोस्टरयुद्ध अशा प्रकारांनी स्थानिक राजकारण तापले आहे. राज्याची तिजोरी कोणाच्या हातात? खरी ताकद कोणाची? वर्चस्व कुणाचे? या प्रश्नांवरून नेते खुलेआम शब्दयुद्ध करताना दिसतात. सत्ताधा-यांपैकीच प्रत्येकजण स्वत:ची ताकद सिद्ध करण्यासाठी एकमेकांना अडचणीत आणताना दिसत आहे.
अलीकडेच भाजप आणि शिंदे गटातील कडवटपणा सर्वांत टोकाला गेला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे काही नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले. हा शिंदे गटासाठी मोठा आघात ठरला. यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेने मुंबईतील मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली नाही. त्यानंतर शिवसेना खासदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, आपल्या लोकांना फोडले जात असल्याची तक्रार जोरदार मांडली. फडणवीसांनीही कमी न पडता, फोडाफोडीत पहिले तुम्हीच पुढाकार घेतला होता, अशी टोलेबाजी केली. हे सर्व घडत असताना महायुतीतून एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर डोळा ठेवू नये, असा तात्पुरता तह करण्यात आला. मात्र राजकीय वर्तुळाचा अंदाज आहे की हा तह जास्त काळ टिकणे अवघड आहे.
महायुतीत समन्वयाची कमतरता
याच दरम्यान अजित पवार गटही स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारी निर्णय, निधी वाटप, पक्ष संघटन या मुद्यांवर त्यांची नाराजी असल्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या चर्चांना अनुपस्थिती दाखवणे हेही त्याचाच भाग असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे महायुतीत समन्वयाची पूर्णपणे कमतरता असल्याचे स्पष्ट दिसते. प्रत्येक पक्ष स्वत:चा अजेंडा पुढे रेटताना दिसत आहे.

