मुंबई : प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रिपांचे प्रमुख रामदास आठवले, मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षातील मान्यवरांच्या हस्ते हा वचननामा आज रविवारी, ११ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आला. प्रचाराच्या तोफा थंडावत असताना मुंबईकरांवर महायुतीने आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. विविध विषयांना या वचननाम्यात हात घालण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेसाठी महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या वचननाम्यामध्ये मुंबईकरांसाठी अनेक योजना आणि आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वचननाम्यातील सर्व हायलाईट्स मांडले. त्यानुसार, गेल्या काही वर्षांत मुंबईतील मराठी माणूस हा उपनगरात गेला आहे. त्याला परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
पुनर्विकास राबवताना येणारे अडथळे दूर केले आहेत. एसआरए, म्हाडाच्या इमारती, सेसच्या इमारती, नॉन सेसच्या इमारतीचा निर्णय घेतला आहे. पाणीपट्टीत दरवर्षी ८ टक्के वाढ होते. आम्ही पाच वर्षांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईला प्रदूषणमुक्त करण्याचे काम केले आहे. मुंबई खड्डेमुक्त करणार आहोत. आम्ही फक्त मांडून थांबणार नाही. त्याची अंमलबजावणी करणार असल्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.
मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. एसआरए आणि क्लस्टरच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. क्लस्टरच्या माध्यमातून सुनियोजित मुंबईचा विकास करणार आहोत. १७ प्रकल्प हाती घेतले आहेत. गिरणी कामगारांना हक्काचं घर देणार आहोत. १२ हजार लोकांना आम्ही घर दिले आहे. अमित साटम यांना माहीत आहे. ते यात अग्रेसर होते. मुंबई आणि एमएमआरमध्ये घरे दिली. हक्काची घरे देण्याचे वचन दिले आहे. मुंबईचा माणूस हद्दपार झाला आहे. त्यांना पुढे आणण्याचे काम करायचे आहे असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.
मराठी माणसासाठी आश्वासनांचा पाऊस
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना काय काय मिळणार याची घोषणा केली. काही वर्षांत मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घातला नाही तर ते प्रश्न सुटू शकतात असा आत्मविश्वास मुंबईकरांमध्ये तयार केला आहे. त्यामुळे इतर कुणीही वचननामा दिला तर त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आणि आमच्या ट्रॅक रेकॉर्डमध्ये असलेल्या अंतरामुळे वचननामा पूर्ण करू. पाच वर्षांनंतर जनतेच्या समोर जाऊ तेव्हा वचननाम्यावर आधारित अॅक्शन टेकन रिपोर्ट फॅक्टशीट म्हणून मांडू. काय केलं होतं हे सांगू, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आम्ही वचन पाळणारे
डीम कन्व्हेन्सचे विषय सोडले. जागा फ्री होल्ड करण्याचे काम आम्ही केले. हाईटच्या समस्या सोडवल्या. भविष्यात याला चालना देण्याचा प्रयत्न करणार आहे. मुंबईत राहणारा मराठी माणूस काहीही झाले तरी मुंबई सोडून जाणार नाही. मुंबईतच त्याला घरं देऊ हा संकल्प घेतला आहे. बीडीडी चाळ, पत्रा चाळ, विशाल सह्याद्रीत हे करून दाखवलं आहे. काही लोक केवळ मराठी माणसाच्या घराबद्दल बोलत असतात. आम्ही वचन पाळणारे आहोत. म्हाडाचे लेआऊट्समध्ये रिडेव्हलपमेंट करताना अधिकची जागा देत आहोत. त्यात पारदर्शकता आणली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

