Homeलातूरमहायुतीच्या जि. प. सदस्यांची मुंबईवारी

महायुतीच्या जि. प. सदस्यांची मुंबईवारी

पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी नेत्यांसह बैठक, अध्यक्ष, उपाध्यक्षांची सोमवारी निवड
लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेत कॉंग्रेस पक्ष सर्वांत मोठा ठरला असला तरी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. अशा स्थितीत सत्ता स्थापनेसाठी महायुतीच्या गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेपूर्वी आगळीक घडू नये, म्हणून महायुतीच्या नेत्यांनी जिल्हा परिषद सदस्यांना मुंबईला बोलावून घेतले आहे. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मुंबईतील पन्हाळगड निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली असून, आता जि. प. मध्ये सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला ५९ पैकी २३ जागांवर विजय मिळाला असून, लातूर जिल्हा परिषदेत कॉंग्रेसच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर १८ जागा जिंकत भाजप दुस-या क्रमांकाचा तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने १२ जागा जिंकल्या आहेत.
लातूर जिल्हा परिषदेत कोणत्याच पक्षाला बहुमत नाही. परंतु काही ठिकाणी भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) व शिंदेसेनेने महायुती करून निवडणूक लढवली तर काही ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवली. त्यामुळे सत्ता स्थापेसाठी शह-काटशह सुरू होता. असे असले तरी भाजप १८, राष्ट्रवादी (अजित पवार) १२, शिंदेसेना १ सत्ता स्थापनेसाठी एकत्र येऊ शकतात. पंचायत समिती सभापती व उपसभापतीपदाच्या निवडी पार पडल्यानंतर सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड होणार आहे. त्यासाठी महायुतीच्या नेत्यांंनी सदस्यांना मुंबईत बोलावण्याचा निर्णय घेतला असून गुरुवारी सकाळी हे सर्व सदस्य मुंबईत डेरेदाखल झाले. सत्ता स्थापनेच्या संदर्भाने नेते मंडळीमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई वारीत सत्ता स्थापनेचे सूत्र ठरवले जाऊ शकते. त्यामुळे महायुती म्हणून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार का, यानंतरही राष्ट्रवादी वेगळी भूमिका घेणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. यासोबतच जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ््यात पडणार, याचीही उत्सुकता वाढली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR