मविआत मैत्रीपूर्ण लढत?, विधानपरिषद निवडणुकीत रंगत वाढणार
मुंबई : प्रतिनिधी
विधानपरिषदेच्या ५ शिक्षक व पदवीधर मतदारसंघांची निवडणूक २३ ऑक्टोबर रोजी होत असून, जागावाटपावरून महायुती व महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. पुणे शिक्षक व पदवीधरपैकी एक जागा मिळावी, यासाठी शिंदेंच्या शिवसेनेने आग्रह धरला होता. परंतु या दोन्ही जागा भाजपाच्या पारड्यात गेल्या असून येथे बंडखोरी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेसने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाली. अमरावती व पुणे पदवीधरमध्ये महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, असे सूतोवाच काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि ठाकरेसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी केले.
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी २३ ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवार उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. मात्र सत्ताधारी महायुती व महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. महायुतीत शिवसेनेने अमरावती व पुणे शिक्षक मतदारसंघावर दावा सांगितला होता. परंतु पुणे पदवीधर व शिक्षक या दोन्ही जागा भाजपच लढवेल, अशी ठाम भूमिका प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यामुळे या दोन्ही जागा भाजपच लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
जागा भाजपला,
वाद शिवसेनेत
शिंदे सेनेचे मंगेश चिवटे तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले सचिन सानप पुणे शिक्षक मतदारसंघातून इच्छुक आहेत. महायुतीत पुण्याची जागा भाजपला मिळाल्याची माहिती आहे. असे असताना शिंदे सेनेच्या दोन इच्छुकांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. तसेच राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे सुनिल टिंगरे यांनीही या जागेसाठी दावा केला आहे. यामुळे पुण्यात महायुतीत बंडखोरीची शक्यता आहे.
मविआत स्वबळाचे नारे!
विधानपरिषदेच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत जुंपली आहे. पदवीधर, शिक्षक निवडणुकीसाठी काँग्रेसकडून तीन उमेदवारांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसनं परस्पर उमेदवारांची नावं जाहीर केल्याने शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेने अमरावती, संभाजीनगर व पुण्याची जागा लढवण्याची घोषणा केली आहे. हा यामुळे निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी आज मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. पण बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. उद्या पुन्हा बैठक होणार आहे.
















