26.2 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रमहायुतीमुळे महाराष्ट्राची अधोगती

महायुतीमुळे महाराष्ट्राची अधोगती

राज्यावर कर्जाचा बोजा; जयंत पाटलांची जोरदार टीका

मांजरी : शरद पवार साहेबांनी हडपसरच्या विकासासाठी चेतन तुपे यांना संधी दिली होती. मुंढवा-केशवनगर दोन मतदारसंघांच्या मध्यभागी आहे. त्यामुळे इकडे चेतन तुपे आणि तिकडे सुनील टिंगरे या दोन गद्दार आमदारांनी लावलेल्या दिव्यांमुळे तुमच्यासमोर समस्यांचा डोंगर उभा राहिलेला आहे.

या समस्या सोडवण्याची जबाबदारी महापौर म्हणून प्रभावी काम केलेल्या प्रशांत जगताप यांनी घेतली असून, त्यांना हडपसरच्या प्रतिनिधित्वाची संधी द्यायची आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप यांच्या प्रचारार्थ झेड कॉर्नर मांजरी येथे आयोजित जाहीर सभेत जयंत पाटील बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, मतदारसंघात तीनशे कोटी आणल्याचे चेतन तुपे म्हणतात. पण त्यातून काम तर काहीच दिसत नाही. मग हे पैसे गेले कुठे? याचा जाब जनतेने विचारावा. गेल्या पाच वर्षांत शहराला न्याय देऊ शकले नाहीत. मतदारसंघातील एकही प्रश्न त्यांना सोडवता आलेला नाही. ज्यांनी सर्वकाही दिले, त्यांच्या वयावर टीका करीत गद्दारी केली.

शरद पवार यांच्यावर टीका करणा-या लोकांच्या मांडीवर जाऊन ते बसलेत. म्हणून निष्ठेने काम करणा-या प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तुमच्या आशीर्वादाने त्यांना विधिमंडळात पाठवायचे आहे. या मतदारसंघातील सर्व प्रश्न सोडवण्याचा आराखडा आणि इच्छाशक्ती त्यांच्याकडे आहे.

लोकसभेत फटका बसल्यानेच शिंदे-फडणवीस-पवार त्रिकुटाने राज्याच्या तिजोरीचे दारे बाजूला ठेवून घोषणांचा पाऊस सुरू केला. सगळेच लाडके असल्याचे सांगत प्रसिद्धीसाठी वारेमाप पैशांची उधळपट्टी केली. राज्यावर लाखो कोटींचे कर्ज केले आहे. मात्र, हे लोक २० नोव्हेंबरपर्यंतच लाडक्या बहिणी म्हणणार आहेत. त्यानंतर त्या लाडक्या राहणार नाहीत.
सल्लागारांच्या भरवशावर हे राज्यकर्ते काम करत आहेत. मागच्या अडीच वर्षांत महायुती सरकारने महागाई दिली. जीएसटीचा बोजा लादला. समस्यांचा डोंगर उभा केला. कराच्या माध्यमातून वर्षाला तुमच्याकडून लाखभर रुपये वसूल करून वर्षाकाठी तुम्हाला सात-आठ हजार रुपये देतात आणि स्वत:चा ऊर बडवून घेताहेत, हे दुर्दैवी आहे,’’ अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

आमचे घड्याळ चोरून नेणा-यांना सर्वोच्च न्यायालयाने चिन्हाखाली ‘न्यायप्रविष्ट’ लिहिण्याची सक्ती केली. हे जगातील पहिलेच उदाहरण असावे. ज्यांनी राष्ट्रवादी पक्ष जन्माला घातला, त्यांना त्यापासून तोडण्याचे पाप भाजपने केले. त्यामध्ये ज्यांना आम्ही मोठे केले, तेच लोक होते. मात्र, आजही ८४ वर्षांचा हा योद्धा दिवसाला चार-पाच सभा घेतो. त्यांचा उत्साह, जिद्द आपल्याला प्रेरणा देणारी आहे.

जयंत पाटील पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी गुजरातचे मांडलिकत्व स्वीकारून राज्य मोदी-शहांच्या दावणीला बांधले आहे. हे लोक त्यांच्यासमोर चकार शब्दही काढत नाहीत. त्यामुळे दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र गुजरातच्या मागे पडला असून, ११ व्या स्थानी फेकला गेला आहे. या अपयशाचे धनी फडणवीस आहेत.

महाराष्ट्राला पिछाडीवर घेऊन जाण्याचे पाप यांनी केले आहे. राज्य अधोगतीकडे जात असून, कर्जबाजारी होत आहे. आजघडीला महाराष्ट्रावर नऊ लाख कोटींचे कर्ज आहे. शिवतीर्थावर झालेल्या मोदींच्या सभेला माणसे नाहीत. शिराळ्यात अमित शहांच्या सभेला माणसे नाहीत. जनता यांच्याकडे पाठ फिरवू लागली आहे. भ्रष्ट सरकारमुळे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमध्ये पुतळा कोसळला. यांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR