21.6 C
Latur
Wednesday, January 14, 2026
Homeसोलापूरमहायुती तुटली; शिंदे गट- अजित गटाची वेगळी चूल

महायुती तुटली; शिंदे गट- अजित गटाची वेगळी चूल

सोलापूर : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये शनिवारपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. शनिवारी महाविकास आघाडीने यशस्वीपणे आपले जागा वाटप जाहीर केले. मात्र महायुतीला ते जमले नाही. रविवारी शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एकत्र येत महापालिकेसाठी युती करण्याचे घोषित केले. परिणामी महायुती तुटली आहे.

शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या युतीची अधिकृत घोषणा रविवारी दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी सोलापुरातील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत केली. पत्रकार परिषदेला शिवसेनेचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, सह संपर्कप्रमुख साठे, अमर पाटील, मनोज शेजवाल आदी नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस कडून जिल्हाध्यक्ष संतोष पवार, जुबेर बागवान, आनंद चंदनशिवे आणि सुधीर खरटमल आदी नेते उपस्थित होते. यावेळी दोन्ही पक्षांकडून महापालिकेच्या १०२ जागांपैकी प्रत्येकी ५१ जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. मोठा भाऊ छोटा भाऊ असा भेदभाव न करता दोन्ही पक्षांनी निम्या जागा वाटून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

महायुती अंतर्गत भाजप शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू होते. परिणामी महायुतीतील प्रत्येक प्रमुख घटक पक्ष आपल्या ताकतीची मोठी घोषणा करत होता. दुसरीकडे मागील वेळी एक हाती सत्ता मिळवलेल्या भाजपला ते पटत नव्हते. भाजपने प्रारंभी पासूनच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी युती करण्याबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा केल्याचे दिसून येत नव्हते. दुसरीकडे पारंपारिक मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे पक्षाबरोबर युतीबाबत अनुकूलता दर्शवली होती.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय कदम, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, अमर पाटील, प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी शिवसेनेने भाजपकडे ४४ जागांची मागणी केली. भाजपकडून त्यावर आमदारांशी चर्चा करून कळविण्यात येईल, असे सांगितले होते.

मात्र, भाजपकडून केवळ १५ जागा देण्यात येणार असल्याची कुणकुण लागताच शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्याचा निर्णय पक्का केला. त्यासाठी पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांच्या परवानगीने माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी राष्ट्रवादीचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर भरणे यांनीही सोलापुरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केली. वरिष्ठांच्या कानावर याबाबतची माहिती दिली. त्यानंतर शिवसेना नेत्यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, जुबेर बागवान, आनंद चंदनशिवे आणि सुधीर खरटमल यांच्याशी चर्चा केली. चर्चेनंतर मध्यरात्री शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीचा निर्णय निश्चित झाला, असे दोन्ही पक्षातर्फे सांगण्यात आले.

भाजपची रिपाइं आठवले गटाबरोबर युती?

महायुतीबाबत बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काही दिवसांपूर्वी रिपाइं आठवले गटाबरोबर युती होण्याची शाश्वती दर्शवली होती. भाजपकडे वाढलेली इच्छुकांची संख्या पाहता एखाद्या तरी मित्रपक्ष बरोबर असावा म्हणून भाजप रिपाइं आठवले गटाबरोबर युती करेल अशी शक्यता आहे. परिणामी अनेक वर्षानंतर रिपाइं आठवले गटाचा नगरसेवक महापालिकेत दिसण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR