Homeमहाराष्ट्रमहाराणी ताराराणी जैन असल्याचा उल्लेख

महाराणी ताराराणी जैन असल्याचा उल्लेख

आचार्य नयन पद्मसागरांकडून वादग्रस्त विधान; मराठीची रचनाही जैन आचार्यने केल्याचा दावा

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत आयोजित जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलताना आचार्य नयन पद्मसागर यांनी ‘स्वराज्यरक्षक महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या’ असे विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महावीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आचार्य नयन पद्मसागर म्हणाले, मोहम्मद घोरीने देशावर आक्रमण केले त्यावेळी जैन असलेल्या मेवाड राणीने आपली तलवार काढली. त्यानंतर पुढील अनेक वर्षे आपल्या देशावर कोणी नजर वर करून बघायची हिंमत केली नाही. संस्कार आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी हातात तलवार घेणे याला धर्म म्हणतात. विक्रमादित्यने पूर्ण भारताला स्वतंत्र करण्यात मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडून त्यांचे हाल केले. त्यावेळी आणखी एका जैन महाराणीचा जन्म झाला आणि ती म्हणजे ताराराणी, असे विधान पद्मसागर यांनी केले आहे.

पुढे बोलताना तर आचार्य नयन पद्मसागर यांनी मराठीची रचना सुद्धा जैनांनी केली असे म्हटले आहे. ते म्हणाले, एकट्या महाराष्ट्रात १ कोटी १२ लाख जैन आहेत. मराठी भाषेची रचना जैन आचार्यने केली आहे. तसेच संपूर्ण भारतात जेवढे खरे मराठी जर कोण आहेत, तर ते सगळे जैन आहेत. जेवढे पाटील आहेत, पाटील कोणता धर्म पाळतात जैन धर्म. पाटील बघा, चौघुले, सरनाईक हे सगळे जैन आहेत. महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना जैनने सुरू केला आहे. तसेच पहिला फिल्म स्टुडिओ जैनने सुरू केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

महाराणी ताराराणी यांच्याबद्दल थोडक्यात माहिती
छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि राजाराम महाराजांच्या पत्नी असलेल्या महाराणी ताराराणींनी वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी वैधव्य येऊनही अत्यंत खंबीरपणे मराठा साम्राज्याची धुरा सांभाळली. मुघलांसह स्वराज्याच्या अनेक अंतर्गत आणि बा हितशत्रूंचा धडाडीने प्रतिकार करत त्यांनी अनेक लढाया आणि बंडांना तोंड दिले. पतीच्या निधनानंतर तब्बल ६१ वर्षे मराठा साम्राज्यातील राजकीय स्थित्यंतरांचे साक्षीदार राहत त्यांनी आपल्या पराक्रमाने आणि मुत्सद्दीपणाने स्वराज्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्यात अतुलनीय योगदान दिले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि शिवरायांची सून म्हणून त्यांनी जो पराक्रम गाजवला आहे तो मराठी माणसाच्या मनातून कधीच पुसला जाऊ शकणार नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR