मुंबई : प्रतिनिधी
महायुतीने कमरेचे काढून डोक्याला बांधले आहे हे स्पष्ट दिसते. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानजीकच्या चबुत-याला लागून असलेल्या जमिनीचा काही भाग खचल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून महाराष्ट्राची अस्मिता पणाला लागली आहे याचीही चाड यांना नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी करत महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुत-यालगतची जमीन खचल्याची धक्कादायक घटना रविवारी समोर आली. पुतळ्याच्या डाव्या बाजूला मोठे भगदाड पडले असून त्याठिकाणी जमीन खोलवर खचल्याचे दिसत आहे. सुदैवाने पुतळ्यास कसलाही धोका झालेला नाही. पुतळा भक्कम असून जमीन खचली आहे. त्यामुळे हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. हा शिवद्रोह आहे. यामुळेच केवळ निषेध नाही तर महायुती सरकारचा धिक्कार असो, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
सावंत यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट देखील केली आहे. ते म्हणतात, शिवरायांचा पुतळा आठ महिन्यांत पडल्यानंतर महायुतीचा भ्रष्टाचारी आणि लज्जाहीन चेहरा समोर आला होता. आता त्याच पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. यातून महायुतीने कमरेचे काढून डोक्याला बांधले आहे हे स्पष्ट दिसते. महाराजांच्या पुतळ्याचे हे काम आहे आणि महाराष्ट्राची अस्मिता पणाला लागली आहे याचीही चाड यांना नाही असेही सावंत म्हणाले.
नौसेनादिनानिमित्त मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच हा पुतळा कोसळला होता. त्यानंतर या घटनेची महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत सर्वांनीच गंभीर दखल घेत याच ठिकाणी नव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आणि अश्वारूढ असा पुतळा उभारण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला. तसेच या पुतळ्याची संपूर्ण जबाबदारी प्रसिद्ध चित्रकार राम सुतार यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांनी हा पुतळा अवघ्या सात ते आठ महिन्यांतच उभा केला.
अलीकडेच या पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पणही करण्यात आले. मात्र लोकार्पण करून अवघा महिना उलटत नाही, तोच पहिल्याच पावसात या पुतळ्याच्या चबुत-यालगतची जमीन खचल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
यावर महाराजांचा पुतळा, चबुतरा तसेच पाया सुस्थितीत असून खचलेला भाग पूर्ववत करून घेण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. भविष्यात असा प्रकार घडू नये यासाठी चबुत-याच्या चारही बाजूची तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येणार असल्याचेही विभागाकडून सांगण्यात आले आहे.