16.8 C
Latur
Saturday, December 6, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात गारठा वाढला

महाराष्ट्रात गारठा वाढला

मुंबई : उत्तरेकडील थंड वारे राज्याच्या दिशेने वाहू लागल्याने गारठा वाढला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमान १० अंशाच्या खाली घसरल्याने थंडीची लाट आली आहे. आज राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानासह गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुंबईसह पुणे, विदर्भ, मराठवाडा गारठल्याचे पाहायला मिळत आहे.
बंगालच्या उपसागरात समुद्रापासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वा-यांची स्थिती कायम आहे. राज्यात दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता आणि उकाडा कायम आहे. तर पहाटे गारठा वाढला आहे. त्यामुळे सकाळी थंडी तर दुपारी उकाडा अशी स्थिती नागरिकांना अनुभवायला मिळत आहे.

काल म्हणजेच सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे ३३.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. धुळे येथील कृषि महाविद्यालय येथे राज्याचे हंगामातील नीचांकी ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर जेऊर, जळगाव, निफाड येथील गहू संशोधन केंद्र आणि परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथे पारा १० अंशांच्या खाली घसरल्याने थंडीची लाट आहे.

तापमानाचा पारा १० अंशाखाली घसरल्यास आणि तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास थंडीची लाट आली असे समजले जाते. राज्यात गारठा वाढत असून, सकाळच्या सुमारास धुक्यासह दव पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज राज्याच्या किमान तापमानात घट होत थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुंबई, पुणे, विदर्भ, मराठवाडा, जळगाव, कोकण या भागात गुलाबी थंडीची चादर पसरली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR