मुंबई : महाराष्ट्रात जून आणि जुलैमध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने अनेक भागांमध्ये पाणीटंचाई आणि शेतीच्या नुकसानीची चिंता निर्माण झाली होती. आता मात्र मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. अरबी समुद्रातील चक्राकार वा-यांमुळे कोकण किनारपट्टीसह राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरीला ऑरेंज, तर मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.
जून आणि जुलै महिन्यात राज्याच्या अनेक भागांत अपेक्षित पर्जन्यमान नोंदवले गेले नाही. त्यामुळे शेतक-यांच्या चिंतेत भर पडली आहे. काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला असला तरी तो शेतीसाठी फारसा उपयुक्त ठरला नाही. दुसरीकडे, अनेक भागांमध्ये अद्यापही पावसाची कमतरता कायम आहे. मात्र, आता मान्सूनच्या स्थितीत बदल होण्याची शक्यता असून येत्या काही दिवसांत राज्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने तेथे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीजवळ चक्राकार वारे तयार झाले आहेत. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे किनारपट्टी परिसरात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. कोकणात सकाळपासूनच पावसाच्या सरी सुरू असून पुढील काही तासांत मुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आजपासून पुढील चार दिवस कोकण विभागात पावसाची तीव्रता वाढू शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पावसाबरोबरच पुढील चार दिवस समुद्राची स्थितीही धोकादायक राहण्याची शक्यता आहे. समुद्रात सुमारे चार मीटर उंचीच्या लाटा निर्माण होण्याचा अंदाज असल्याने मच्छिमारांनी विशेष खबरदारी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जून महिन्यापासून आतापर्यंत राज्यात सरासरी अपेक्षित पावसाच्या तुलनेत सुमारे ५० टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे अजूनही जवळपास ५० टक्के पावसाची भर पडणे बाकी असल्याचे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढत असताना हवामान विभागाने राज्यातील २२ जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. मुंबईलाही यलो अलर्ट देण्यात आला असून पुढील काही दिवस राज्याच्या विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेली रिपरिप आज थांबली असून शहरात कडकडीत ऊन पडले आहे. रस्ते वाहतूक सुरळीत असून लोकल ट्रेनची सेवाही व्यवस्थित सुरू आहे. सध्या कुठेही पाणी साचलेले नाही. मात्र, हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिल्याने परिस्थितीत अचानक बदल होऊ शकतो आणि संध्याकाळपर्यंत पुन्हा पावसाच्या सरी सुरू होण्याची शक्यता आहे.















