Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्यच

महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्यच

अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा

मुंबई : मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेत प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेसाठी हिंदी-इंग्रजीसोबत मराठी भाषेचा समावेश करत प्रशासनाने सुधारित अधिसूचना जाहीर केली आहे. मनसेच्या इशा-यानंतर मराठी अस्मितेला न्याय मिळाला असला तरी महाराष्ट्रात मराठी अपरिहार्य आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेला योग्य सन्मान मिळायलाच हवा. पुन्हा अशी चूक करून मराठी तरुणांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा मनसे नेते अमित राज ठाकरे यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला दिला.

मध्य रेल्वेने १६ मार्च रोजी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली होती. मात्र, यात हिंदी व इंग्रजी या भाषांचा समावेश करून मराठी भाषेला डावलल्याने संतापाची लाट उसळली होती. याविरोधात अमित यांनी रेल्वे प्रशासनास पत्र लिहून महाराष्ट्रात भरती प्रक्रिया होत असताना मराठी भाषेला डावलणे योग्य नसल्याचे सांगत प्रशासनाचा निषेध केला होता. त्यानंतर प्रशासनाने २२ एप्रिल रोजी नवी अधिसूचना जारी करत त्यात मराठीचा समावेश केला आहे.

रस्त्यावर उतरण्याची वाट पाहू नका
अमित यांनी सोशल माध्यमावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ही केवळ भाषेची नव्हे तर मराठी अस्मिता व हक्कासाठीची लढाई होती. हा आमचा नाहीतर स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्काचा व मराठी अस्मितेचा विजय असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात मराठी अपरिहार्य असताना अशा चुका वारंवार होतातच कशा? प्रत्येक वेळी पत्रव्यवहार करावा किंवा रस्त्यावर उतरावे लागेल याची वाट पाहू नका. स्वत:ची जबाबदारी ओळखून प्रशासनाने मराठीचा समावेश आधीच करणे अपेक्षित आहे. भविष्यातही अशा भरती प्रक्रियेत मराठीचा सन्मान राखला जावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR