छ. संभाजीनगर : देशभरातल्या वाढत्या इंधन दरांवरून नागरिकांमध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठ दिवसांत पेट्रोल-डिझेलचे भाव तीनवेळा वाढल्याने परिस्थिती अजून बिकट झाली आहे. ग्रामीण भागात विशेष करून परभणी, हिंगोली, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यांत नागरिकांनी पेट्रोल-डिझेल भरण्याकरता पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे. यावरूनच आता शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. देशात आणि महाराष्ट्रात सध्या सरकारच्या नावावर ‘सर्कस’ सुरू असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.
राज्यात इंधन टंचाईच्या उद्भवलेल्या प्रश्नावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुणीही इंधनाचा साठा करू नये यासाठी प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्यावरून आता अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले अंबादास दानवे?
अंबादास दानवे यांनी आपल्या अधिकृत ‘’ अकाऊंटवरून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, ‘‘देशात आणि महाराष्ट्रात सध्या सरकारच्या नावावर निव्वळ ‘सर्कस’ सुरू आहे! पेरणीच्या तोंडावर बियाणांसाठी व्याजाने पैसे उभे करताना जो शेतकरी टाचा घासतो, त्याला हे सुसाट राज्यकर्ते थेट ‘साठेबाज’ ठरवून मोकळे होतात! या तथाकथित साठेबाजीचा एकतरी साठा कुठे जप्त झाला आहे का? नसेल तर मग पुरवठा विभाग झोपला आहे का?’’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
ते पुढे म्हणाले, ‘‘दुसरीकडे, जालना जिल्ह्यात काल ‘शाही फर्मानाचा’ कळस पाहायला मिळाला. ट्रॅक्टरची कागदपत्रे आणि नोंदणी क्रमांकाशिवाय कॅनमध्ये डिझेल देणार नाही, असे फर्मान काढण्यात आले. पण जे गरीब शेतकरी नांगरणीसाठी भाड्याने ट्रॅक्टर आणतात, त्यांनी डिझेल कुठून आणायचे, यावर स्पष्टीकरण यात नाही. जनतेच्या हातातील गाड्या हिरावून घेऊन, त्यांच्या हातात ‘हातगाड्या’ देणे, हाच या सरकारचा ‘मास्टरस्ट्रोक’ दिसतोय! व्वा रे महायुती.. अन व्वा रे एनडीए!’’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत
















