लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय अधिवेशन व वार्षिक आमसभा दि. २६ व २७ जानेवारी रोजी हिंगोलीतील रामलिला मैदानासमोरील महावीर भवन येथे होणार आहे, अशी माहीती महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विके्रता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर वर्धा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून यासाठी शेकडो वृत्तपत्र विक्रेते उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनाचे उद्घाटन २७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोली पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकूळे असणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून हिंगोलीचे आमदार हेमंत पाटील व हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विके्रता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, ज्येष्ठ सल्लागार शिवगोंडआण्णा खोत यांच्याबरोबरच आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे, माजी आमदार गजानन घुगे, माजी खासदार शिवाजीराव माने, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगांवकर, हिंगोली जिल्हा परिषदेचे सीईओ विवेक गायकवाड, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. डी. बांगर, हिंगोलीच्या नगराध्यक्षा रेखाताई बांगर, कळमनुरीच्या नगराध्यक्ष श्लेषा चौधरी, वसमतच्या नगराध्यक्षा सुमनबाई बाहेती हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनात वृत्तपत्र विके्रत्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात येणार असून स्वतंत्र वृत्तपत्र विके्रता मंडळाची अंमलबजावणी, पेन्शन योजना, आरोग्य व शिक्षण सुविधा, विक्रेत्यांची अधिकृत नोंदणी, पेपर स्टॉलसाठी जागा उपलब्धता, शासकीय योजनांचा लाभ, वैद्यकीय सुविधा, विक्रेता भवन उभारणी तसेच रेल्वे व एस. टी. प्रवास सवलती आदी मुद्यांवर ठराव मांडण्यात येणार आहेत. या राज्यस्तरीय अधिवेशनामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडल्या जाणार असून त्यांच्या हक्कांसाठी संघटनात्मक ताकद वाढीस लागणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
अधिवेशनच्या मुख्य दिवशी २७ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता प्रभात फेरी होणार आहे. त्यानंतर पहील्या सत्रात अधिवेशन उद्घाटन सोहळा, मान्यवरांचे मार्गदर्शन, विविध चर्चासत्रे होणार आहे. दुस-या सत्रामध्ये राज्य संघटनेची आमसभा दुपारी २ वाजता होणार आहे. ४ वाजता समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे आयोजन श्रमिक वृत्तपत्र विक्रेता संघटना, जिल्हा हिंगोली यांच्या वतीने करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागासह जास्तीत जास्त वृत्तपत्र विक्रेता बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संगमेश्वर खंदारे, सचिव तानाजी पारगावे आदींनी केले आहे.

