मुंबई : विधानपरिषदेच्या १७ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या जागावाटपावरून सत्ताधारी महायुतीत रस्सीखेच सुरू असतानाच शुक्रवारी महाविकास आघाडीने १५ जागांवर एकमत केले आहे. नांदेड आणि नाशिकच्या जागांवर तीनही पक्षांनी दावा केल्याने या दोन जागांवरून मविआत तिढा आहे. आघाडीच्या जागावाटपानुसार काँग्रेसच्या वाट्याला ८, उद्धवसेना ४, तर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला ३ जागा आल्या आहेत.
विधानपरिषदेच्या जागावाटपाची चर्चा करण्यासाठी मविआच्या नेत्यांची शुक्रवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, उद्धवसेनेचे खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, तर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. दोन जागांबाबत आमची अद्याप चर्चा सुरू आहे. दोन दिवसांत उर्वरित दोन जागांबाबत अंतिम निर्णय होईल. नांदेड व नाशिकच्या जागेबाबत तीनही पक्षांनी दावा केला आहे. त्यामुळे या दोन्ही जागा वगळता इतर १५ जागांबाबत आम्ही निर्णय जाहीर केला , असे हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी सांगितले.
महायुतीकडून पैशांचा प्रचंड वापर
निवडणुकीत भाजप आणि महायुतीकडून पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून, नगरसेवकांची पळवापळवी सुरू आहे. लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकीचे घोडेबाजारात रूपांतर झाल्याचा आरोपही त्यांनी केली. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने विविध मतदारसंघांसाठी वरिष्ठ नेत्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यातत आली आहे.
मविआचे जागावाटप
काँग्रेस : नागपूर, वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली, यवतमाळ, भंडारा- गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-लातूर-बीड
उद्धवसेना : रायगड- रत्नागिरी-सिंधुदुर्ग, जळगाव, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष : पुणे, ठाणे , सांगली-सातारा
















