23.6 C
Latur
Thursday, June 19, 2025
Homeसंपादकीय विशेषमहाशक्तीची महाराष्ट्रात दमछाक!

महाशक्तीची महाराष्ट्रात दमछाक!

अबकी बार, चारसौ पार’ चा नारा देऊन लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपाला रोखणे केवळ अवघडच नाही तर अशक्य आहे, असे वातावरण दोन महिन्यांपूर्वी देशात होते. स्वतंत्रपणे लढलो तर कोणाचाच टिकाव लागणार नाही या भीतीने सर्व मतभेद बाजूला ठेवून विरोधक एकत्र आले. भाजपाचा अश्वमेध रोखण्यासाठी ‘इंडिया’ आघाडी स्थापन करण्यात आली. ही आघाडी निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच जागावाटपाच्या खडकावर आपटून फुटेल, असे सर्वांना वाटत होते. पण काही राज्यांतील अपवाद वगळता राष्ट्रीय स्तरावर आघाडी झाली. ‘कही की ईट, कही का रोडा; भानुमती ने कुनबा जोडा’ अशा शब्दांत या ‘इंडी’ आघाडीची चेष्टा केली गेली. पण याच इंडी आघाडीने अनेक राज्यांत एकास एक उमेदवार उभे केल्याने भाजपाच्या गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या घोडदौडीचा वेग मंदावला आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून प्रसारमाध्यमांवर निवडणूकपूर्व व मतदानोत्तर जनमत चाचण्यांचे अंदाज प्रसिद्ध करण्यावर बंधन आले आहे. तरीही या सर्वेक्षणातून समोर येणारे कल सत्ताधारी भाजपाची अस्वस्थता वाढवणारे असल्याचे बोलले जात आहे. विशेषत: महाराष्ट्राचा कल सत्ताधा-यांची काळजी वाढवणारा ठरला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांची वाढलेली संख्या, त्यांच्या भाषणातले बदललेले विषय, शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याबाबत बदललेला सूर, यावरून वेगवेगळे तर्क-वितर्क सध्या सुरू आहेत. एकीकडे पवार व उद्धव ठाकरे यांच्या पक्षांचा नकली राष्ट्रवादी, नकली शिवसेना, असा उपरोधिक उल्लेख करून टीका करताना, भविष्यातील संभाव्य तडजोडीसाठी साखरपेरणीही केली जात आहे. त्यामुळे ‘ऑल इज नॉट वेल’ अशी शंका मात्र निर्माण झाली आहे. एकीकडे हे सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष व विरोधकांच्या आघाडीचे एक प्रमुख नेते शरद पवार यांनी, लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील, काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीनही होतील, असा अंदाज वर्तवला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत काहीही फरक नाही. वैचारिकदृष्ट्या आम्हीसुद्धा गांधी, नेहरू यांच्याच विचारसरणीचे आहोत, असे सूचक वक्तव्य त्यांनी केल्याने, शरद पवार आपला गट काँग्रेसमध्ये विलीन करणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरू विचारसरणीचे आहोत. मात्र सहका-यांचा सल्ला घेतल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही.

वैचारिकदृष्ट्या आम्ही त्यांच्या (काँग्रेसच्या) जवळ आहोत. पक्षाबाबतचे पुढील सर्व निर्णय सामूहिकपणे घेतले जातील, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. पाठोपाठ नंदुरबार येथील प्रचारसभेत बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा इकडे या, तुमची सगळी स्वप्नं पूर्ण होतील, अशी खुली ऑफर देऊन आणखी गोंधळ उडवून दिला. पंतप्रधान म्हणाले, ‘बारामतीच्या निवडणुकीनंतर पवार चिंतेत असावेत. ४ जूननंतर राजकारणात टिकून राहायचे असेल तर छोट्या-छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावे लागेल, असे त्यांना वाटतेय. याचाच अर्थ नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे मन तयार केले आहे. मात्र, मी त्यांना सांगतो ४ जूननंतर काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या. सर्व स्वप्नं पूर्ण होतील’’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांच्या वक्तव्याचा स्वर उपरोधिक असला तरी बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे हा भविष्यातील दोस्तीसाठीचा प्रस्ताव तर नाही ना ? असाच त्याचा अर्थ लावला गेला. शरद पवार यांच्या भावी राजकीय वाटचालीबाबत संभ्रम निर्माण करण्याचाही प्रयत्न असू शकेल. काही दिवसांपूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबतीतही प्रेम दाखवले होते.

‘बाळासाहेबांचे पुत्र म्हणून मी उद्धव ठाकरेंचा मानसन्मान करतो. ते माझे शत्रू नाहीत. जर उद्या ते अडचणीत आले तर त्यांच्या मदतीला जाणारा मी पहिला व्यक्ती असेन, असे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा मी त्यांना तात्काळ फोन केला होता. मी नेहमी वहिनींना (रश्मी ठाकरे) फोन करून उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचो, असे सांगत त्यांनी, राजकीय मतभेद असले तरी, कौटुंबिक पातळीवर आपले उद्धव ठाकरेंशी संबंध चांगले असल्याचे सूचित केले होते. त्यामुळे स्वाभाविकच ही साखरपेरणी कशासाठी हा प्रश्न उपस्थित होतो. मागच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने महाराष्ट्रातील ४८ पैकी ४१ जागा जिंकत घवघवीत यश मिळवले होते. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन तृतीयांश आमदार, खासदार सोबत आले असले तरी त्या यशाच्या जवळपासही पोचता येणार नाही याची जाणीव भाजपा नेत्यांनाही झाली आहे. त्यामुळे आणखी कुमक गोळा करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही भविष्यात एकत्र येण्याची शक्यता सपशेल फेटाळून लावली आहे. राजकारणात काहीही होऊ शकते, पण आज तरी नक्की तशी चिन्हं दिसत नाहीत. लोकसभा निवडणुकीचे निकाल काहीही आले तरी चार महिन्यांनी होणा-या विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणी एकदम वेगळी भूमिका घेण्याची शक्यता कमीच आहे.

वायकरांच्या व्यथेने महायुतीची अडचण !
ईडी, सीबीआय, आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षातील नेत्यांची छळवणूक करून त्यांना सोबत येण्यास भाग पाडल्याचा आरोप भाजपावर सातत्याने केला जातो. ज्यांच्या ज्यांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लागला ते नंतर भाजपासोबत गेल्याची अनेक उदाहरणं आहेत. विरोधक नेहमीच आरोप करतात. परंतु आजपर्यंत यामुळे आपण त्यांच्यासोबत गेलो अशी कबुली कोणी दिली नव्हती. मागे एकदा भाषणाच्या ओघात हर्षवर्धन पाटील यांनी ‘सत्ताधारी पक्षासोबत असल्याने चांगली झोप लागते’ असे विधान करून विरोधकांच्या आरोपांना दुजोरा दिला होता. मात्र आता त्याही पुढे जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे, महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी जाहीर कबुली देऊन आपल्याच नेत्यांची गोची केली. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वायकर यांनी, ‘मला चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आले. त्यानंतर माझ्यासमोर तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय उरले होते. अखेर जड अंत:करणाने मी पक्ष बदलला. नियतीने अशी वेळ कोणावरही आणू नये’, असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांना आयतेच नवे हत्यार मिळाले आहे.

चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांची फारशी इच्छा नसतानाही लगेच त्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. मनाविरुद्ध सोबत आलेले व बळजबरीने निवडणुकीच्या रिंगणात ढकललेले वायकर किती मनापासून निवडणूक लढवतील याबाबत शंका होतीच. त्यात त्यांनी आपल्याला चुकीच्या प्रकरणात गोवून पक्षांतर करायला भाग पाडल्याचा आरोप करून गोंधळ उडवून दिला आहे. नंतर वायकर यांनी सारवासारव करत आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले. पण जायचा तो मेसेज गेला आहे. चौकशी सुरू असताना मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन-तीनदा भेटलो होतो. त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी सर्व ऐकून घेतल्यानंतर त्यांनी संबंधित अधिका-यांना बोलावून घेतले आणि त्यांना विचारणा केली होती. त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे माझ्यावरील तणावाचे सावट दूर झाले. उद्धव ठाकरेंनी मात्र आपल्याला कोणतीही मदत केली नाही, असे त्यांनी नंतर सांगितले. दर दोन दिवसांनी भूमिका बदलणा-या या उमेदवारासाठी कोणत्या तोंडाने मते मागायची असा प्रश्न आता महायुतीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

आज गणिताचा पेपर !
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशातील ९६ मतदारसंघांत आज मतदान होणार असून, त्यात राज्यातील ११ मतदारसंघ आहेत. यातील संभाजीनगर व शिरूर वगळता उर्वरित नऊ जागा मागच्यावेळी महायुतीने जिंकल्या होत्या. मात्र यावेळी त्यांना सर्वच मतदारसंघांत कडवी लढत द्यावी लागत आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे, तसेच पंकजा मुंडे, चंद्रकांत खैरे, अमोल कोल्हे, सुजय विखे अशा मातब्बर उमेदवारांसमोर तगडे आव्हान आहे. संभाजीनगर, मावळ आणि शिर्डी या तीन मतदारसंघांत शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाचा सामना आहे. तर शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने आहेत. पुढच्या टप्प्यात मुंबई-ठाण्यातील १० मतदारसंघांसह १३ मतदारसंघांत निवडणूक आहे. त्या सर्वच्या सर्व जागा युतीने जिंकल्या होत्या. शेवटच्या दोन टप्प्यातील २४ मतदारसंघांपैकी २२ जागा युती व केवळ दोन जागा विरोधक अशी मागच्या वेळची स्थिती होती. त्यामुळे महायुतीसाठी हे दोन टप्पे अतिशय महत्त्वाचे व निर्णायक असणार आहेत.

-अभय देशपांडे

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR