लातूर : प्रतिनिधी
पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दि. १ ते ३० जून दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अंमली पदार्थ विरोधी मोहिम उघडली होती. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी लातूर जिल्हयातील २ हजार १५७ पानटप-यांची झाडाझडती घेतली. या मोहिमेत १२ गुन्हे दाखल करून यात निष्पन्न झालेल्या आरोपीतांकडून ४३ लाख ९३ हजार ४७७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नांदेड परिक्षेत्रात दि. १ ते ३० जून, दरम्यान राबविण्यात आलेल्या सदर मोहिमे दरम्यान, गुटखा व्यावसायिकांविरुद्ध कलम १२३ भारतीय न्याय संहितेअंतर्गत लातूर जिल्ह्यात १२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २४ आरोपीतांकडून ४३ लाख ९३ हजार ४७७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात केला आहे. तसेच या कालावधीत २ हजार १५७ पानटप-यांची झाडाझडतीही घेण्यात आली आहे. यामुळे लातूर जिल्हयातील पानटप-या कांही दिवस बंद राहिल्याचे पाहयला मिळाले. पानटप-या बंद असल्या तरी चोरून-चोरून गुटखा व्यावसाय ओळख व संपर्कावर सुरूच होता.
‘खबर’ हेल्पलाईनला नागरिकांची पसंती
अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलीसांना पोहोचविता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने ९१५०१ ००१०० हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, सदर हेल्पलाइन वरून नागरिक अवैध व्यवसायांची अचूक माहिती पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहोचवत आहेत. नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी व आपल्या भागातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.
















