लातूर : प्रतिनिधी
विलासराव देशमुख फाउंडेशनकडून आयोजित या ‘व्ही.डी.एफ. बाजार २०२६’ उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून, यामध्ये अनेक महिला उद्योजिका व बचत गट सदस्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. आज आपण दिवाळीच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमात एकत्रित जमलो आहोत. लातूर शहर व जिल्ह्यातील महिला भगिनींना एक व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम विलासराव देशमुख फाउंडेशनकडून करण्यात आले आहे. पण एकदा उद्योग सुरू करायचा म्हटल्यास सर्वात आधी घरातूनच विचारणा होते आणि अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी कुटुंबातील सर्व सदस्यांनी घरकाम सांभाळत आपल्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी महिला उद्योजिका म्हणून जे प्रयत्न चालवले आहेत, त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
तेजोमय दिवाळीच्या सणानिमित्त स्थानिक महिला उद्योजिका, बचत गट आणि लघुउद्योजकांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आणि ‘एक पाऊल महिला सबलीकरणाकडे’ हा विचार समोर ठेवून, विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ या संकल्पनेतून ‘व्ही.डी.एफ. बाजार २०२६’ या उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुल मैदानात आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते आणि लातूरच्या महापौर जयश्रीताई सोनकांबळे व उपमहापौर अॅड. स्रेहल उटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. गोल्ड क्रेस्ट ग्रुप ऑफ स्कूलच्या प्रमुख सौ. अदितीताई अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून आणि विलासराव देशमुख फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित या ‘व्ही.डी.एफ. बाजार’ संकल्पनेमुळे स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देणे, महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे यास प्राधान्य देण्यात आले आहे.
यावेळी स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, अॅड. किरण जाधव, अॅड. समद पटेल, युनूस मोमिन, लातूर शहर काँग्रेस अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर, सौ. आशाताई भिसे, बालाजी झिपरे, श्रीमती संगीता मोळवणे, प्रवीण सूर्यवंशी, गजानन बोयने, विष्णू मदने, प्रीतम जाधव, उदय पाटील, धर्मवीर भारती, अतिश चिकटे, सोनाली थोरमोटे, सचिन गायकवाड, गिरीश ब्याले, तबरेज तांबोळी, आसिफ बागवान, व्यंकटेश पुरी, प्रा. संजय ओहोळ, नितीन कांबळे यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकेचे सदस्य, तसेच विलासराव देशमुख फाउंडेशन व गोल्ड क्रेस्ट हायस्कूलचे संचालक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नवउद्योजक, महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकनेते विलासराव देशमुख यांनी लातूरवर नेहमीच अफाट प्रेम केले. सध्या दुष्काळाची चर्चा केली जाते; परंतु ‘लातूर म्हणजे दुष्काळ आणि दुष्काळ म्हणजे लातूर’ अशी चर्चा न करता, आपण सर्व लातूरकर वासीयांनी पाण्याचा अपव्यय टाळावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, जेणेकरून उपलब्ध पाणी आपल्याला पुरवून वापरता येईल. यासाठी लातूर मनपा प्रशासन आणि नगरसेवकांनी विशेष प्रयत्न करावेत, असे सांगून आमदार देशमुख म्हणाले की, विलासराव देशमुख फाउंडेशनकडून आयोजित हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून, या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी अनेकांचे मोलाचे योगदान आहे. आज उद्योजक होण्यासाठी आणि त्यातही महिला उद्योजिका होण्यासाठी एक विशेष ऊर्जा लागते. ती ऊर्जा आज या ठिकाणी जमलेल्या महिला उद्योजिका तसेच व्यासपीठावर येऊन आपले मनोगत व्यक्त करणा-या शिराळा येथील चिंगू तांबोळी नामक महिला उद्योजिकेच्या कार्याकडे पाहिल्यास प्रकर्षाने जाणवते. आज छत्रपती संभाजीनगर नंतर लातूरचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. आपल्याला आपल्या लातूरला खूप पुढे न्यायचे आहे. सध्याची लातूरची सर्वांगीण प्रगती हा केवळ एक ‘ट्रेलर’ असून चित्रपट अजून बाकी आहे! येणा-या काळात लातूरच्या विकासाचा आराखडा तयार करताना महिला भगिनींना देखील एक वेगळे स्थान निर्माण करून देण्याचा आमचा उद्देश आहे.
केवळ लातूर शहर व जिल्ह्यातील महिलांना उद्योगासाठी जागा देऊन न थांबता, राज्याच्या बाहेरून उद्योगासाठी लातूरमध्ये येऊ इच्छिणा-या नवउद्योजिका महिला भगिनींनाही जागा उपलब्ध करून देण्यासाठी लातूर मनपाने पुढाकार घ्यावा. अनेकदा महिला भगिनींना स्टॉलचे अवाढव्य दुकान भाडे परवडत नसल्यामुळे त्यांना घरातूनच काम करावे लागते आणि त्यांच्या अनेक अडचणी असू शकतात. त्यांच्याशी आपण चर्चा करावी, अधिकाधिक महिलांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी मनपाने एक सर्वसमावेशक आराखडा तयार करावा आणि मनपाच्या महापौर व महिला नगरसेविकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या. तसेच, विलासराव देशमुख फाउंडेशनच्या माध्यमातून सौ. अदिती देशमुख या गेल्या अनेक वर्षांपासून प्रामुख्याने महिला सक्षमीकरणासाठी काम करण्यासोबतच वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देत आहेत आणि महिला भगिनींसाठी सातत्याने पुढाकार घेत आहेत, असे नमूद करून त्यांनी विलासराव देशमुख फाउंडेशनच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आणि ‘व्ही.डी.एफ. दिवाळी बाजार २०२६’ उपक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या.
यावेळी महापौर सौ. जयश्रीताई सोनकांबळे म्हणाल्या की, विलासराव देशमुख फाउंडेशनच्या माध्यमातून आणि माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व सौ. अदितीताई अमित देशमुख यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या या ‘व्ही.डी.एफ. दिवाळी बाजार २०२६’ उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. सौ. आशाताई भिसे यावेळी बोलताना म्हणाल्या, महिलांना उद्योजिका बनण्यासाठी विलासराव देशमुख फाउंडेशनकडून मिळालेली ही एक मोठी संधी असून याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, असे सांगितले. निर्णय प्रक्रियेत जेव्हा एखादी महिला येते तेव्हा त्या महिलेची आर्थिक प्रगती अत्यंत महत्त्वाची ठरते. आज महिला घर सांभाळत विविध क्षेत्रात आपली चुणूक दाखवत आहेत. या दिवाळी बाजार २०२६ च्या माध्यमातून महिलांना उद्योजिका बनण्यासाठी मोठी संधी मिळाली असून, नक्कीच महिला भगिनींची आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल, असे म्हणाल्या. उपमहापौर अॅड. स्रेहल उटगे म्हणाले की, विलासराव देशमुख फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेले शिलाई मशीन प्रशिक्षण, महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण, ब्युटी पार्लर, आरोग्य शिबिर यासह अन्य उपक्रम शिकण्याची व राबविण्याची संधी मिळाली, असे सांगत विलासराव देशमुख फाउंडेशन आणि महिला सक्षमीकरण हे एक समीकरण बनल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी लातूर क्रेडाईचे उदय पाटील म्हणाले, महिला भगिनींची आर्थिक उन्नती व्हावी या भावनेतून विलासराव देशमुख फाउंडेशनकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘व्ही.डी.एफ. बाजार २०२६’ उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. लातूरवर जेव्हा भूकंप किंवा रेल्वेने पाणी आणण्याची वेळ आली, तेव्हा त्या संकटातून लातूर माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्यामुळेच बाहेर पडले होते; त्याचप्रमाणे सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमधूनही आपण व आपले लातूर यशस्वीरीत्या बाहेर पडेल, असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे प्रासताविक संगीता मोळवणे यांनी केले. सुत्रसंचालन राहूल इंगळे यांनी केले. आभार प्रविण सुर्यवंशी यांनी मानले.
महिला उद्योजिकांना व्यवसायवृद्धीची संधी
‘स्वावलंबनाची दिशा, महिलांच्या हाती व्यवसायाची संधी’ हा संदेश देणा-या या उपक्रमात गृहउपयोगी वस्तू, हस्तकला, खाद्यपदार्थ, कपडे, दिवाळी साहित्य आणि दिवाळी फराळ व सजावटीच्या विविध वस्तूंच्या जवळपास गतवर्षी १२० ते १५० स्टॉलची नोंदणी करण्यात आली होती. यंदाचा वाढलेला प्रतिसाद पाहता, या वर्षीची स्टॉल नोंदणी १८६ इतकी झाली असून ती २०० पर्यंत जाईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. सदरील सर्व स्टॉल्स नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांना स्थानिक उत्पादनांचा पर्याय उपलब्ध करून देतानाच, महिला उद्योजिका आणि बचत गटांना आपल्या वस्तू थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची सुवर्णसंधी या बाजारातून आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा
या कार्यक्रमात लातूर जिल्ह्यातील शिराळा येथील महिला उद्योजिका चिंगू तांबोळी यांनी अचानक कार्यक्रमाच्या स्टेजवर येत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व आभार मानले.
मान्यवरांनी दिल्या सर्व स्टॉल्सला भेटी
आमदार अमित विलासराव देशमुख, सौ. जयश्रीताई सोनकांबळे, अॅड. स्रेहल उटगे, सचिन बंडापल्ले, प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी ‘व्ही.डी.एफ. दिवाळी बाजार २०२६’ मधील महिला उद्योजिकांच्या स्टॉल्सची फीत कापून उद्घाटन केले व स्टॉल्सची पाहणी केली. तसेच, नवउद्योजिका महिला भगिनींनी ग्राहकांसाठी विक्रीस उपलब्ध करून दिलेली उत्पादने आणि त्यांच्या दरांची सविस्तर माहिती घेऊन सर्व महिला उद्योजिकांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
















