लातूर : प्रतिनिधी
विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या कार्याच्या वारसा पुढे घेऊन जात विलासराव देशमुख फाऊंडेशनमार्फत ग्रामीण तसेच शहरी महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून शिक्षण, प्रशिक्षण दिले जात आहे. महिलांनी या योजनांचा लाभ घेत स्वत:च्या पायावर उभे राहावे, असे आवाहन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.
शहरातील साईधाम रोडवरील शिवाजी स्कूलच्या जवळील श्रीजीत अपार्टमेंटमध्ये रुपाली अजय बोराडे-पाटील यांच्या रुपाली फॅशन स्टुडिओचे उद्घाटन रविवारी सायंकाळी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास डॉ. सारिका देशमुख, विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या संगीता मोळवणे, तुळजापुरच्या माजी नगराध्यक्षा विद्याताई गंगणे, जनाबाई बोराडे-पाटील, सुलनबाई जाधव, सीमा संतोष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
रुपाली बोराडे-पाटील यांनी स्थापन केलेल्या फॅशन स्टुडिओचे कौतूक करुन चेअरमन श्रीमती वैशालीताई देशमुख पुढे म्हणाल्या, रुपाली यांनी उभं केलेलं काम खुप कष्टाचे आणि मोलाचे आहे. महिलांनी रुपालीच्या या कामातून खुप काही शिकण्यासारखं आहे. खरे तर महिलांनी स्वत:तील उपजत कलागुण जोपाले पाहिजेत. ज्ञानाचे आदान-प्रदान व्हावे. यातून पुढे जाण्याची, प्रगती करण्याची दारे खुली होतात. झपाट्याने विकासीत होत असलेल्या लातूर शहरात रुपाली फॅशन स्टुडिओ मोलाची भर टाकेल. रुपालीला अजयची मिळालेली खंबीर साथ रुपालीला बळ देणारी ठरली. दोघा पती-पत्नीने एकमेकांना दिलेल्या आधारातून एवढे मोठे काम उभे राहिले.
विकासरत्न विलासरा देशमुख यांच्या कार्याचा वारसा घेऊन विलासराव देशमुख फाऊंडेशन ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांसाठी खुप मोठे काम करीत आहे. विलासराव देशमुख फाऊंडेशनने ग्रामीणमधील २७ गावे दत्तक घेतली आहेत. तसेच लातूर शहरातील १८ प्रभागांमध्येही विलासराव देशमुख फाऊंडेशनचे काम सुरु आहे. महिलांना शिलाई मशिनचे प्रशिक्षण देणे, स्वसंरक्षणासाठी शिक्षण देण्याचे मोठे काम सुरु आहे. महिलांनी याचा लाभ घेत स्वावलंबी बनावे, असे आवाहनही चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.
प्रारंभी चेअरमन वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे उद्घाटन झाले. यावेळी संगीता मोळवणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी महापौर प्रा. डॉ. स्मिता खानापूरे, नगरसेविका सपना किसवे, नगरसेविका तब्बसूम शेख, नगरसेविकास स्वाती घोरपडे, दिलीप माने, डॉ. अभय कदम, रमेश बिरादार, सुधाकर तोडकर, पुरुषोत्तम मदने, यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते. पाहूण्यांचे स्वागत रुपाली बोराडे-पाटील, अजय बोराडे-पाटील, सुमनताई जाधव, मदनेताई, वैशाली भोसले यांनी केले. सूत्रसंचालन दर्शना देशमुख यांनी केले. रुपाली बोराडे यांनी आभार मानले.
















