लातूर : प्रतिनिधी
महिलांमध्ये जिद्द, चिकाटी आणि उपजत कौशल्य असतात. नारीशक्तीचा आज जगभर बोलबाला आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. लातूर शहरात विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाचा उपक्रम खुप मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे त्यामुळे महिलांनी स्वकौशल्य विकासावर भर देऊन स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले. शहरातील सूत मिल रोडवरील कोकाटेनगरमधील मधुमीरा फंक्शन हॉलच्या परिसरातील मीरा सारीज अॅण्ड टेक्सटाईल्सचा शानदार शुभारंभ दि. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख बोलत होत्या. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, विलास को-ऑप. बँकेचे चेअरमन किरण जाधव, विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या संगीताताई मोळवणे, रेणापूर पंचायत समितीच्या सभापती मोनीकाताई सूर्यवंशी, उपसभापती अॅड. शेषेराव हाके यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिला उद्योजिका बनल्या पाहिजेत, असे नमुद करून श्रीमती वैशालीताई देशमुख पुढे म्हणाल्या, महिलांसाठी विविध क्षेत्रात खुप मोठी संधी आहे. युवतींनी उच्चशिक्षीत होऊन सर्वोच्च पदापर्यंत पोचावे. महिलांनी वेळेतील वेळ काढून उद्योगक्षेत्रात पदार्पण केले पाहिजे. विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या माध्यमातून शिकवल्या जाणा-या विविध कोर्सेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या वेळी मोनिकाताई सूर्यवंशी, संगीताताई मोळवणे यांनीही शुभेच्छा दिल्या. पाहुण्यांचे स्वागत मीराताई जाधव, हर्षल जाधव, संगीता सूर्यवंशी, शीलाताई जाधव, तानाजी जाधव, आकाश जाधव, पांडुरंग गरुड, सुभाष जाधव यांनी केले. सूत्रसंचालन व आभार रमेश सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमास महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















