बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मांजरा प्रकल्पात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. प्रकल्प तब्बल ८७ टक्क्यांपर्यंत भरला असून, पुढील दोन दिवसांत आणखी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्याची वेळ येऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या दोन दिवसापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे बीड मधील धनेगाव येथे असलेल्या मांजरा प्रकल्पात पाणीसाठा ८७ टक्क्याच्या वर पोहोचलाय. मांजरा धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या १८ तासातच या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालीय. १५ ऑगस्ट रोजी दुपारी या धरणात ५७ टक्के असलेला पाणीसाठा १६ऑगस्ट रोजी सकाळी १२ वाजता थेट ८७ टक्क्यावर पोहोचला आहे. यामुळे आता पुढील दोन वर्षापर्यंत परिसरातील पाणी प्रश्न मिटला आहे. बीड जिल्ह्यात असलेल्या मोठ्या प्रकल्पापैकी मांजरा एक असून याच मांजरा धरणातून बीड, लातूर,धाराशिव जिल्ह्यातील २२ गावांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच या धरणाचे पाणी शेतीच्या सिंचनासाठी देखील वापरण्यात येते.
जर धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागला, तर मांजरा नदीच्या पात्रालगतच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे बीड, लातूर, धाराशिव आणि कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाटबंधारे विभागाने याबाबतचे पत्र संबंधित जिल्हाधिका-यांना पाठवले असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
नदीकाठच्या गावक-यांनी अनावश्यक धोका न पत्करता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अशी विनंती करण्यात येत आहे. विशेषत: पूरकाठावरील शेती, जनावरांचे चारण तसेच घरांची सुरक्षितता याकडे ग्रामस्थांनी लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
पाऊस अजूनही कायम
हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मांजरा प्रकल्पातील पाण्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे.
पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोथाळा, साळेगाव,मोगरा, गावासह परिसरातील तब्बल पंधरा गावात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे. मध्यरात्री झालेल्या पावसाने शेताला तळ्याचे स्वरुप आले आहे. परिसरातील शेकडो एकरवरील पिके पाण्याखाली गेले आहेत. तर अनेक नद्या ओसंडून वाहत आहेत. नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने माजलगाव तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

