लातूर : प्रतिनिधी
समाजकारण, राजकारणात वाटचाल करीत असताना सातत्याने आम्ही शेतकरी हीत डोळ्यासमोर ठेवून काम केल्याने मांजरा परिवाराच्या माध्यमातून जिल्हाभरात शेतक-यांच्या जिवनात आर्थिक क्रांती घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो आज पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. मांजरा परिवाराने नवनवीन प्रयोग करून उपपदार्थ प्रकल्प हाती घेवून तेही उत्तमप्रकारे चालत आहेत. यामुळें शेतक-यांना अधिक भाव देण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वीचे सर्व गाळप हंगाम यशस्वी झाले असून विद्यमान गाळप हंगामातसुद्धा ९ लाख मेट्रिक टन ऊसाचे विक्रमी गाळप यशस्वी होईल, असा विर्श्वास माजी मंत्री तथा विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी येथे बोलताना व्यक्त केला.
येथील विलासनगरमधील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ३९ व्या बॉयलर अग्नी प्रदीपन, गळीत हंगाम शुभारंभ, नवीन ऊस तोडणी यंत्र पुजन माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते दि. ७ नोव्हेंबर रोजी शानदार सोहळ्यात करण्यात आले. त्यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत होते.
याप्रसंगी राज्य साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, मांजरा कारखान्याचे व्हाइस चेअरमन अशोकराव काळे, लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले, मांजरा कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय देशमुख, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अॅड. प्रवीण पाटील, संत शिरोमणी कारखान्याचे उपाध्यक्ष सचिन पाटील, इंदिरा सुतगिरणीचे चेअरमन बाळासाहेब कदम, जिल्हा बँकेचे संचालक अनुप शेळके, राजकुमार पाटील, पृथ्वीराज सिरसाट, सचिन दाताळ, संतोष देशमुख, संभाजी सुळ, अॅड. बाबासाहेब गायकवाड, कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, ऊस विकास समिती अध्यक्ष कैलास पाटील, तात्यासाहेब देशमुख, वसंत उपाडे, सदाशिव कदम, अनिल दरकसे, मदन भिसे, धनराज दाताळ, शंकरराव बोळंगे, निळकंठ बचाटे, नवनाथ काळे, सचिन शिंदे, ज्ञानेश्वर पवार, बालाजी पांढरे, दयानंद बिडवे, भैरू कदम, तज्ज्ञ संचालक श्रीकृष्ण काळे, सुरेश चव्हाण, विलास चामले, अरुण कापरे, तक्रार निवारण समिती अध्यक्ष तानाजी जाधव, कार्यकारी संचालक पंडित देसाई आदींची उपस्थिती होती.
ऊस तोडणीचा आदर्श पॅटर्न
पुढे बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की, विद्यमान गळीत हंगाम हा प्रतिकुल असला तरी योग्य नियोजनातून हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सारे सज्ज आहेत. हा हंगाम ९ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट असून सर्वांचा ऊस वेळेत तोडला जावा यासाठी यंत्रणा तत्पर आहेत. १०० टक्के ऊस हा ऊसतोडणी यंत्राद्वारे तोडण्याचा एक आदर्श पॅटर्न विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याने सुरू केला आहे. साखरे सोबतच उपपदार्थ निर्मितीतून जास्तीचा दर देण्याचा आमचा प्रयत्न असून चालू वर्षी प्रति मेट्रिक टन किमान ३१५१ ऊस दर देण्याचा निर्णय घेतला असून ऊस तोडणीसाठी कारखाना प्रशासनाने अतिशय योग्य नियोजन करून ऊसाची तोडणी करावी, अशा सूचना मंत्री मंत्री दिलीपराव देशमुख यांनी यावेळी दिल्या तसेच ऊस तोडणीसाठी यंत्रणा पूर्णपणे सक्षम असून ऊस तोडणीसाठी कोणालाही अडचण येणार नाही यासाठी कारखाना प्रशासन तत्परतेने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोकराव काळे यांनी गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी केलेल्या नियोजनाची माहिती देवून मांजरा कारखान्याच्या आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीचा लेखा जोखा यावेळी प्रास्ताविक भाषणातून मांडला. सुत्रसंचालन सचिन सुर्यवंशी यांनी केले तर आभार संचालक दयानंद बिडवे यांनी मानले. कार्यक्रमास विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय संचालक मंडळ, विविध संस्था पदाधिकारी, शेतकरी, सभासद, खाते प्रमुख, ऊस उत्पादक, मांजरा साखर परिवारातील संस्थांचे पदाधिकारी, कार्यकारी संचालक, संचालक मंडळ सदस्य, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

