विलासनगर : प्रतिनिधी
शेतकरी हितासाठी कायम कार्यरत असलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या प्रत्यक्षात गाळपास दि. १६ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली असून विद्यमान गळीत हंगामात ९ लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट कारखान्याने निश्चित केले आहे. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर साखर कारखान्याने आजपर्यंतचे सर्व गळीत हंगाम यशस्वी केले आहेत. मोठ्या कष्टाने शेतकरी आपला ऊस पिकवत असतात त्यामुळे त्यांचा ऊस वेळेत गाळप होण्यासाठी कारखान्याकडे आलेल्या नोंदी प्रमाणे ऊस तोडीचे नियोजन सातत्याने करून जास्तीचा ऊस दर देण्याचे काम केले आहे.
विद्यमान गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठीचे सर्व नियोजन कारखान्याने केले आहे. काही दिवसांपूर्वी कारखान्याचे चेअरमन तथा मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी आमदार तथा लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते व विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर साखर कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ झाला. विद्यमान गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला किमान दर ३१५० राहील, असे सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व कारखाना संचालक माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी जाहीर केला असल्याने शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

