आळंदी : प्रतिनिधी
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यात रथाला बैलजोडी लावण्याच्या परंपरेवरून आळंदीमध्ये वाद सुरू आहे. या अनुषंगाने बैल निवड समितीने आळंदी पोलिसांत तक्रार दाखल करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी लेखी पत्राद्वारे केली आहे.
सन १९८२ पासून या रथास बैलजोडी लावण्याची हमी व जबाबदारी बैलजोडी निवड समितीकडे आहे. यावर्षी रोटेशनप्रमाणे रानवडे परिवाराला मान देण्याचे ठरले होते, मात्र त्यांच्यातील अंतर्गत वाद मिटू शकला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करून बैठक घेण्यात आली होती, परंतु त्यामध्येही पूर्ण सहमती होऊ शकली नाही. उमेश रानवडे यांनी स्वत:ची बैलजोडी लावण्याच्या हट्टापायी उपोषण सुरू करून विनाकारण वाद निर्माण केल्याचा आरोप निवड समितीने केला आहे.
मात्र उमेश रानवडे यांच्याकडे स्वत:ची शेती, गोठा किंवा बैलजोडी नसून त्यांनी ती भाड्याने आणली आहे असे निवड समितीच्या चौकशीत समोर आले असून काही स्थानिक व्यक्ती व संस्थांनी वैयक्तिक फायद्यासाठी आणि राजकीय हेतूने या व्यक्तीला चिथावणी देऊन पोलिस प्रशासनावर विनाकारण ताण निर्माण केल्याचा गंभीर आरोपही बैल निवड समितीने केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती पोलिस कारवाई करावी, अशी मागणी बैलजोडी निवड समितीने पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त आणि आळंदी पोलिस ठाण्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
















