छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतक-यांची परिस्थिती बिकट झाली आहे. हाती आलेले पीक वाहून गेले, जमिनी खरवडून निघाल्या आणि शेतक-यांपुढे जगण्यासाठीही संकट उभे राहिले आहे. अशा गंभीर स्थितीत सरकारकडून मिळणारी मदत ‘तुटपुंजी आणि अपमानास्पद’ असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, सरकारला आधीच पत्र लिहून ओला दुष्काळ जाहीर करून शेतक-याची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी आम्ही केली आहे. मात्र सरकारने आतापर्यंत कोणतीच घोषणा केलेली नाही.
मदतीच्या नावाखाली तुकडा फेकू नका : वडेट्टीवार
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आरोप केला की, शेतक-यांना मदत करायची वेळ आली की सरकारच्या तिजोरीत खडखडाट सुरू होतो. पण नको असलेल्या शक्तिपीठांसाठी आणि स्वत:च्या जाहिरातींसाठी मात्र कोट्यवधी रुपये खर्च करायला पैसे सरकारला लगेच मिळतात. केंद्राकडे प्रस्ताव पाठवून जास्तीचा निधी घेऊन यावा आणि शेतक-यांना निकषांपलीकडे जाऊन मदत द्यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
















