औसा : प्रतिनिधी
माजी केंद्रीय गृहमंत्री तथा माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर व माजी खासदार गोपाळराव पाटील या लातूर जिल्ह्याच्या दोन सुपुत्रांचे राज्याच्या आणि देशाच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे. सामाजिक जीवनातील त्यांच्या योगदानाची आणि सेवेची दखल घेऊन या दोन्ही कर्तृत्ववान सुपुत्रांना पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे तसेच तशी शिफारस भारत सरकारकडे करण्याची मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाकडे शिफारस करण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
माजी केंद्रीय गृह मंत्री तथा पंजाबचे माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांचे महाराष्ट्र राज्यासह देशाच्या राजकीय सामाजिक क्षेत्रात केलेली प्रदीर्घ सेवा आणि दिलेले बहुमूल्य योगदान तसेच माजी खासदार गोपाळराव पाटील यांचे महाराष्ट्रासह देशाच्या वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात दिलेले अमूल्य योगदान याबाबत महाराष्ट्र शासनाने या दोन्ही सन्माननीय व्यक्तीच्या या कार्याची आणि त्यामाध्यमातून केलेली अविरत देशसेवेची नोंद घेऊन माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर आणि माजी खासदार गोपाळरााव पाटील यांना देशाच्या सर्वोच्च सेवेसाठी महामहीम राष्ट्रपती यांच्या हस्ते दिल्या जाणा-या मानाच्या पद्म पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वतीने केंद्र शासनास शिफारस करावी, अशी मागणी औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाकडे शिफारस करण्याचे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी आ अभिमन्यू पवार यांना दिले आहे. याच विषयासंदर्भात आ अभिमन्यू पवार लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिं्ांदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी करणार आहेत.