लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य भारत आणि गाईड्स राज्यसंस्थेचे सहाय्यक राज्य प्रशिक्षण आयुक्त गोविंद केंद्रे यांनी राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र पंचमढी मध्य प्रदेश येथे संपन्न झालेल्या युनिट लीडरसाठीचे सर्वोच्च लीडर ट्रेनर हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा स्काऊट गाईड चळवळीतील सिल्वर एलिफंट या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असणारे सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी त्यांचा प्रशिक्षणाचे बिट्स व प्रमाणपत्र देऊन यशोचित सन्मान आशियाना निवासस्थानी शुक्रवारी केला.
सदरील प्रशिक्षण पूर्ण करणारे गोविंद केंद्रे हे लातूरचे पहिले भूमिपुत्र ठरले. याबद्दल दिलीपराव देशमुख यांनी त्यांचे मनस्वी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी लातूर भारत स्काऊट्स आणि गाईड जिल्हा कार्यालयाचे जिल्हा संघटक डॉक्टर शंकर चामे, माजी जिल्हा चिटणीस गोविंद गुडसुरे, लातूर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, सचिव बजरंग चोले, एस जी मेहत्रे, आंतरराष्ट्रीय कराटे कोच तुषार अवस्थी, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त युवराज माने, आबा जोगदंड, सचिन सुरवसे आदी उपस्थित होते.