ठाणे : प्रतिनिधी
भिवंडी महापालिकेतील कोणार्क विकास आघाडीचे विजयी उमेदवार माजी महापौर विलास पाटील व प्रतिभा पाटील यांच्या बंगल्यावर हल्ला करण्यात आला. हल्ला करणारे भाजपा आमदार महेश चौघुले यांचे पुत्र मित चौगुले व त्यांचे समर्थक असल्याचा विलास पाटील यांच्याकडून करण्यात आला. या हल्ल्यामुळे विलास पाटलांच्या समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात या संदर्भात ठिय्या मांडलेला. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज देखील करण्यात आला. दोन्ही गटात मोठ्या प्रमाणात राडा झाला आहे.
आधी विलास पाटील यांच्या बंगल्यावर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. त्यानंतर आमदार महेश चौघुले यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. दोन्ही गटाच्या आंदोलकांना पोलिसांनी पांगवले असून सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.
भाजपा आमदाराचं कार्यालय फोडले
याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गटाच्या दोन्ही नेत्याकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यांच्या तक्रारीवरुन दोन्ही गटावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप किती जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तरी भिवंडीत तणाव ग्रस्त परिस्थिती निर्माण होऊन सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आहे. या हल्ल्यात माजी महापौर विलास पाटील यांच्या पत्नी माजी महापौर प्रतिभा पाटील जखमी झाल्या आहेत.

