कोल्हापूर : प्रतिनिधी
लग्नासाठी सतत तगादा लावणा-या प्रेयसीची तिच्याच प्रियकराने हत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात उघडकीस आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या माजी सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे यांचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा निष्कर्ष प्राथमिक तपासात समोर आला आहे.
खून केल्यानंतर आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वत:च्या कारमधून भिवंडीकडे घेऊन जात असताना भिवंडी पोलिसांनी संशयावरून वाहनाची तपासणी केली. त्यावेळी हा खून उघडकीस आला.
या प्रकरणी संशयित प्रकाश ऊर्फ बाबू आनंदा पाटील याला भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, लग्नासाठी दबाव आणत असल्याच्या कारणावरून आरोपीने ही हत्या केली. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास भिवंडी आणि शाहूवाडी पोलिस करत आहेत.
लग्नासाठी मागे लागलेल्या प्रेयसीचा काटा काढून तिच्या मृतदेहाची भिवंडीत विल्हेवाट लावण्याचा प्रियकराचा प्लॅन होता. मात्र, कारमधून मृतदेह वाहून नेणा-या या नराधमाचा डाव पोलिसांनी उधळून लावला. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने शाहूवाडीत एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करण्यात येत आहे.
















