बारामती : राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे माजी कृषी व क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने आपला आधारस्तंभ व पाठीराखा हरपल्याची भावना व्यक्त केली आहे. दादा नेहमीच माझा ‘पाठीराखा’ म्हणून संकटात आणि अडचणीच्या काळात माझ्यामागे भक्कमपणे उभे राहिले. दादांसारखा ‘कमिटेड’ नेता होणे नाही, अशा भावना कोकाटे यांनी व्यक्त केल्या.
मी पाचव्यांदा आमदार म्हणून विजयी झालो. मी स्वत:हून दादांकडे मंत्रिपद मागितले नाही. दादांनी शपथविधीच्या आदल्या दिवशी रात्री ‘तुम्ही उद्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घ्यायला या’ असा निरोप पाठवला आणि त्या क्षणी माझ्या मेहनतीचं चीज झाल्याचे वाटले. मी मंत्रिपद मागायच्या आत दादांनी माझी स्वप्नपूर्ती केल्याचे कोकाटे म्हणाले.
अजितदादा हे, वेळेचे पक्के, शब्दाला जागणारे आणि संकटात ढाल बनून उभे राहणारे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचा आधारवड कोसळला आहे. शिस्तीच्या रागातही आईची माया अन् वडिलांचा धाक जपणारे त्यांचे नेतृत्व हरपल्याने, केवळ राजकीय पोकळीच निर्माण झाली नाही, तर माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांचा चालता-बोलता मार्गदर्शक आणि हक्काचा माणूस कायमचा हरपल्याची भावना आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली.
दादांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा त्यावर विश्वासच बसला नाही. त्याची खात्री करण्याचेसुद्धा धाडस झाले नाही; परंतु सातत्याने येणा-या बातम्यांमुळे मनाला धीर दिला. दादांचा स्वभाव सर्वांना माहीत असल्यामुळे त्यांनी दिलेली वेळ आम्ही कधीच चुकविली नाही. दिलेली वेळ पाळण्याबाबत त्यांचा फार आग्रह असायचा. अडचणीच्या काळात आपल्या सवंगड्यांना सांभाळून घेण्याची त्यांची वृत्ती कायम स्मरणात राहील.
दादा प्रेमाने रागवायचे, पण त्या रागातही आईसारखी काळजी, वडिलांसारखी जबाबदारी आणि मार्गदर्शकासारखी शिस्त असायची, याची उणीव प्रकर्षाने जाणवत राहील. दादा अनेक वेळा सिन्नर मतदारसंघात येत असत. विविध विकासकामांचे त्यांनी उद्घाटन केले, प्रचारसभांनाही आवर्जून उपस्थिती लावली. आजही त्यांच्या शब्दांचा आवाज कानात घुमतोय, असा भास होतो. त्यांच्या अचानक जाण्याने सगळं काही एका क्षणात उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटतंय. सकाळी सहा वाजल्यापासून नागरिकांना भेटायला सज्ज असणारे, मैदानात कायम सक्रिय राहणारे, प्रत्येक ठिकाणी वेळेचं काटेकोर पालन करणा-या दादांनी आज चुकीची वेळ निवडली. जणू नियतीचे घड्याळच आज चुकले, अशा भावना कोकाटे यांनी व्यक्त केल्या.

