मुंबई : प्रतिनिधी
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज विधानपरिषदेतील अजित पवारांच्या शोक प्रस्तावावर आपली भावना व्यक्त केली. यावेळी त्यांनी आपल्या आमदार होण्याचा प्रवास उलगडून सांगत अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला.
अमोल मिटकरी म्हणाले, अजित पवारांच्या रुपाने महाराष्ट्र एका धडाकेबाज नेतृत्वाला मुकला. मी एक फार सामान्य कार्यकर्ता आहे. अजितदादांनी माझे शेणाने भरलेले हात पेणाला लावले. आमच्या घरात कोणताही राजकीय वारसा नव्हता. माझ्या वडिलांना, आजोबांना किंवा खानदानात कुणालाही ग्रामपंचायत सदस्यत्व काय असते हे माहिती नव्हते. पण २०१९ मध्ये बारामतीच्या शारदा प्रांगणात छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने एका व्याख्यानाचा योग आला. मला चांगले आठवते. तो रविवारचा दिवस होता. त्या दिवशी दादा उद्घाटन करून जाणार होते.
त्यांनी कार्यक्रमाचा विषय वाचला. वक्त्याचे नाव वाचले. मला म्हणाले, तुम्ही कुठे असता. मी म्हणालो, अकोल्यात असतो. तुम्ही काय करता असे विचारले. त्यावर मी म्हणालो, मी महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकरांचा विचार मांडणारा वक्ता आहे. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे.

