23.8 C
Latur
Wednesday, March 11, 2026
Homeमहाराष्ट्रमाझ्याशी संबंध सिद्ध झाले तर राजीनामा देईन

माझ्याशी संबंध सिद्ध झाले तर राजीनामा देईन

एसीबीच्या छाप्यानंतर नरहरी झिरवाळांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकत दोन कर्मचा-यांना ताब्यात घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात कार्यालयातील कारकून राजेंद्र ढेरंग याने ५० हजार रुपयांची लाच मागून त्यातील ३५ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईनंतर आता मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

झिरवाळ सध्या दिल्ली दौ-यावर असून, तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. एसीबीच्या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना झिरवाळ म्हणाले, मी मागील दोन दिवसांपासून दिल्लीत आहे. काल जी घटना घडली, ती अत्यंत चुकीची आहे आणि असे व्हायला नको होते. राजेंद्र ढेरंग हे लिपिक म्हणून कार्यरत होते. सुनावणीसंबंधी कागदपत्रे तयार करण्याचे काम त्यांच्याकडे होते. ते मूळचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कर्मचारी असून, उसनवारीवर या विभागात नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी केलेल्या गैरप्रकाराला कुठेही पाठिशी घातले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

सरकारी कर्मचा-याने पैसे घेणे चुकीचेच
सदर कर्मचा-याचा पूर्वेतिहास माहिती होता का, या प्रश्नावर उत्तर देताना झिरवाळ म्हणाले, माझ्यासमोर या कर्मचा-याविरोधात यापूर्वी कोणतीही तक्रार आली नव्हती. लाचेची रक्कम कितीही असो, सरकारी कर्मचा-याने पैसे घेणे चुकीचेच आहे. पैसे घेतले असतील, तर त्याची शिक्षा संबंधित व्यक्तीला भोगावीच लागेल असे त्यांनी म्हटले. या प्रकरणाचे धागेदोरे तुमच्यापर्यंत येत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असल्याबाबत विचारले असता झिरवाळ यांनी ठाम भूमिका घेतली. ‘‘जर या भ्रष्टाचाराचे धागेदोरे माझ्यापर्यंत येत असल्याचे सिद्ध झाले, तर त्याची जबाबदारी घेण्यास मी तयार आहे. या प्रकरणाशी माझा थेट संबंध असल्याचे सिद्ध झाल्यास मी राजीनामा देईन असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. तर सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदावर नियुक्ती आणि विलीनीकरणाच्या बाजूने भूमिका घेतल्यामुळे आपल्याविरोधात कट रचला जात आहे का, या प्रश्नावर झिरवाळ म्हणाले माझ्याविरोधात कुणी कट रचेल असे मला वाटत नाही. माझा स्वभाव तसा नाही. जे घडले आहे, त्याची चौकशी होईल आणि सत्य समोर येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR