39.6 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमाढा लोकसभा मतदारसंघावर जयंत पाटलांचा दावा

माढा लोकसभा मतदारसंघावर जयंत पाटलांचा दावा

शरद पवार गटासमोर नवा पेच?

सांगोला : काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघ रासपाला सोडणार असल्याची घोषणा केली होती. मात्र या मतदारसंघात आता मोठा पेच निर्माण होणार असल्याचे दिसत आहे. कारण या मतदार संघावर शेकापने दावा केला आहे.

यासाठी सांगोला येथे शेकापने भव्य मेळावा घेत शक्तिप्रदर्शन केले. सांगोला तालुक्यासह माढा तालुक्यात शेकापची मोठी ताकद आहे त्यामुळे माढासह हातकणंगले हे दोन मतदारसंघ शेकापला मिळावेत असा डाव भाई जयंत पाटील यांच्याकडून टाकला जात असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघ शरद पवारांनी रासपचे प्रमुख महादेव जानकर यांना सोडण्याची तयारी दाखवली होती. त्यातच जयंत पाटलांच्या दाव्याने नवीन तिढा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सांगोलामध्ये आमदार जयंत पाटील, शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासह कार्यकत्यांनी शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात आमदार पाटील यानी इंडिया आघाडीमधून माढा आणि हातकणंगले हे दोन मतदारसंघ शेकापला मिळावे यासाठी आग्रही मागणी केली.

आमदार जयंत पाटील यांच्या दाव्यामुळे रासपसाठी मतदारसंघ सोडायची तयारी दर्शविणा-या शरद पवारांच्या राष्ट्रवादीची गोची होणार आहे. महादेव जानकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन धनगर समाज आपलासा करायची व्यूहरचना शरद पवारांची असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महादेव जानकर यांना माढा सोडण्याची ऑफर दिली होती. याचा फायदा सुप्रिया सुळे यांच्या बारामतीसह इतर मतदारसंघात होऊ शकणार होता. मात्र आता भाई जयंत पाटील यांनी माढा मतदारसंघावर दावा केल्याने आघाडीसमोरील अडचणी वाढणार आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघावरून स्पर्धा
माढा लोकसभा मतदारसंघ अधिकच चर्चेत आला आहे. कारण आधी महायुती आणि आता महाविकास आघाडीत या जागेवरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षात माढा लोकसभा मतदारसंघासाठी पक्षांतर्गत स्पर्धा असल्याचे पाहायला मिळत आहे. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून देखील या जागेवर दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत देखील आता याच मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR