मुंबई : मातंग समाजाकडून मंगळवारी मुंबईत अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातील उपवर्गीकरणावरून मोठे आंदोलन करण्यात आले आहे. अनुसूचित जातींच्या १३ टक्के आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची (अ, ब, क, ड) मागणी प्रलंबित राहिल्यामुळे राज्यभरातील मातंग समाज आक्रमक झाला आहे.
आझाद मैदान परिसरात मातंग समाजाकडून आज आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मात्र, आझाद मैदानाऐवजी मंत्रालय ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हा रस्ता बंद करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली.
पोलिसांनी तातडीने आंदोलकांची धरपकड सुरू केली. पोलिसांकडून बॅरिकेटिंग लावण्यात आले असून परिसरात गोंधळ निर्माण झाला आहे. हा परिसर घोषणांनी दणाणून गेला आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे.
अनुसूचित जातीमधील आरक्षणचा फायदा या काही मोजक्या समाजाने घेतला यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने निरीक्षण नोंदवून हे अनुसूचित जातीमधील आरक्षणच उपवर्गीकरण झाले पाहिजे असा निर्णय दिला आहे पण याची अंमलबजावणी ही राज्य सरकारकडून करण्यात येत नसल्यामुळे आम्हाला आज आंदोलन करावे लागत असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे भाजप आमदार अमित गोरखे यांनी दिली.
आम्हाला कोणाच्या ताटातील आरक्षण नको आहे. आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण हवे आहे आणि आमची लोकसंख्या किती तेवढं आरक्षण आम्हाला हवं आहे ही आमची साधी मागणी आहे आणि या मागणीला इतर समाज देखील पाठिंबा देतील. आज अनुसूचित जातीमधील सर्व समाज घटकांतील बांधव हे सजग झाले आहेत आणि ते आपल्या हक्कांसाठी लढत आहेत, असे गोरखे म्हणाले.
रमेश कदम नजरकैदेत
मुंबईत मातंग समाजाच्या मोर्चात सहभागी होण्यापूर्वीच एनसीपीचे माजी आमदार रमेश कदम यांना पोलिसांनी नजरकैद केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या मोर्चाला जाण्याची परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती पोलिसांनी त्यांना दिली. यामुळे मातंग समाज अधिक आक्रमक झाल्याचे चित्र सध्या मुंबईतील आंदोलनदरम्यान पाहायला मिळत आहे.
















