मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ परिसरात ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेमुळे राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे. ‘मातोश्री’ बंगल्याच्या बाहेर जी जागा संवेदनशील म्हणून आहे, अशा ठिकाणी असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पण हे ड्रोन नेमके येथे काय करत होते याबाबत मुंबई पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
वांद्रे येथील ‘मातोश्री’ बंगल्याशेजारील परिसरात एक अज्ञात ड्रोन घिरट्या घालताना आढळून आले. खरंतर या परिसरात कोणत्याही प्रकारचे ड्रोन किंवा हवाई साधन उडवण्यास बंदी आहे. अशातच ठाकरेंच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘मातोश्री’ हा उच्च सुरक्षा झोन असल्याने हा प्रकार गांभीर्याने घेतला जात आहे. या प्रकारामुळे चर्चांना उधाण आले आहे.
या ड्रोनबाबत मुंबई पोलिसांनी माहिती दिली आहे. एमएमआरडीएच्या परवानगीनेच हे ड्रोन उडवण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. ड्रोनचे हवाई उड्डाणाचे कारणही पोलिसांनी सांगितले आहे. एमएमआरडीएचे सर्वेक्षण सुरू होते त्यामुळे हे ड्रोन उडवण्यात आले असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
या प्रकारानंतर उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी एक्सवरून ‘मातोश्री’ परिसरात ड्रोनचे हवाई उड्डाणाचा व्हीडीओ पोस्ट केला आहे. ‘मातोश्री’वरील सुरक्षा रक्षकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याचा व्हीडीओ शूट केला. त्यामुळे ‘मातोश्री’वरील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा दानवे यांनी पोस्टमध्ये केला आहे. यामुळे ‘मातोश्री’वर टेहळणी केली जात असल्याचा आरोप देखील ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. या आरोपांवर मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.
















