अॅँटानारिवो : वृत्तसंस्था
मादागास्करमध्ये युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष उफाळून आला. सरकारी सुविधांचा बोजवारा, गरीबी, बेरोजगारी यासारख्या विविध मुद्द्यांवरून युवकांनी आंदोलन हाती घेतले. सत्ताधा-यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आले. मादागास्कर याआधी बांगलादेश, नेपाळमध्येही युवकांच्या तीव्र आंदोलनामुळे देशात सत्तांतर घडले आहे.
मादागास्करमध्ये जेन-झेड आंदोलकांच्या तीव्र आंदोलनामुळे सत्तांतर घडलं आहे. आता देशाची सत्ता लष्कराच्या हातात गेली असून कर्नलने राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. कर्नल माइकल रँड्रियनिरिना हे शुक्रवारी उच्च संविधानिक न्यायालयात आयोजित एका कार्यक्रमात मादागास्करमधील राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
दरम्यान, राष्ट्रपतींच्या पलायन आणि महाभियोग मतदानामुळे लष्कराने देशाची सूत्रे हाती घेतली. लष्कराने संसदेच्या कनिष्ठ सभागृहाव्यतिरिक्त सर्व संस्था बरखास्त केल्या आहेत. २५ सप्टेंबर रोजी अनियमित पाणी आणि वीज पुरवठ्यावरून सुरू झालेले हे आंदोलन लवकरच भ्रष्टाचार, गैरव्यवस्थापन आणि गरिबीकडे सरकारच्या दुर्लक्षाविरुद्ध देशव्यापी चळवळीत रूपांतरित झाले. लष्कराची एक तुकडीही या आंदोलनात सहभागी झाल्याने परिस्थिती चिघळली. मादागास्करच्या लोकसंख्येपैकी जवळपास तीन चतुर्थांश लोक गरिबीत जीवन जगत असून तरुणांमधील बेरोजगारी आणि विस्थापनातून हा असंतोष उफाळून आला.

