लातूर : प्रतिनिधी
लातूर येथे मानवी तस्करीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘वॉक फॉर फ्रीडम’चे आयोजन करण्यात आले होते. दि. ३१ जानेवारी रोजी युवा रुरल असोसिएशन, लातूरच्या वतीने अनैतिक मानवी वाहतूक विरोधी ‘वॉक फॉर फ्रीडम’ हा मानवी तस्करीसंपवण्यासाठी जागतिक समन्वित प्रयत्न आहे, जो जगभरातील ५० पेक्षा जास्त देशांत आयोजित केला जातो.
मानवी तस्करी आणि बालविवाह थांबवण्यासाठी सुरू असलेल्या राष्ट्रीय जनजागृती मोहिमेचा भाग म्हणून लातूर येथे ‘वॉक फॉर फ्रीडम’ जनजागृती रॅली काढण्यात आली. या उपक्रमात लातूरमधील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी/नागरिकांनी सहभाग घेतला.
‘वॉक फॉर फ्रीडम’ ही शहरातील प्रमुख रस्त्यांवरून एकाच रांगेत काढण्यात आलेली मूक रॅली होती. सहभागी नागरिकांनी मानवी तस्करीची वास्तव परिस्थिती सांगणारे फलक हातात धरले होते. मानवी तस्करीच्या पीडितांचा आवाज दडपला जातो, त्यांच्या समर्थनार्थ हा मोर्चा शांततेत काढण्यात आला.

‘वॉक फॉर फ्रीडम’च्या सुरुवातीला सहभागी नागरिकांना मानवी तस्करीची लक्षणे ओळखण्याबाबत माहिती देण्यात आली तसेच एखादी व्यक्ती अडचणीत दिसल्यास संपर्क करण्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक सांगण्यात आले. यामध्ये १०९८ (अडचणीत असलेल्या मुलांसाठी चाईल्डलाईन), १८१ (महिलांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन) आणि १९३० (सायबर गुन्हे हेल्पलाईन) यांचा समावेश होता. सहभागी नागरिकांनी हे क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केले आणि आपल्या परिसरात मानवी तस्करी रोखण्यासाठी जागरूक नागरिक म्हणून सक्रिय भूमिका घेण्याची शपथ घेतली.
त्यानंतर हा मोर्चा संत नामदेव प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा परिसर लातूर येथून सुरू होऊन परिसरातील सार्वजनिक रस्त्यांवरून फिरून पुन्हा त्याच ठिकाणी समाप्त झाला.

