लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात अवकाळी पावसाने मे महिण्यात धुमाकूळ घातला. या अवकाळी पावसामुळे जिल्हयातील नदी, नाले, ओढे वाहू लागले होते. त्यामुळे अधिग्रहणाची संख्या ११५ वरून ८४ पर्यंत खाली आली. जून मध्ये अधिग्रहणाची संख्या कमी होणे अपेक्षित असताना गेल्या १५ दिवसापासून पावसाचे सतत न राहिल्याने व मान्सूनच्या पावसाने ताण दिल्याने अधिग्रहणाची संख्या गेल्या आठ दिवसात ८४ वरून ९० च्या घरात पोहचली आहे. ग्रामीण भागात पुन्हा पाणी टंचाईची तिव्रता पुन्हा वाढताना दिसून येत आहे.
जिल्हयात पाणी टंचाईच्या झळा मार्च पासून जाणवू लागल्या आहेत. तसेच तापमानाचा पारा वाढत गेल्याने नद्या, नाले, विहिरी कोरडया पडल्याने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरीकांची भटकंती सुरू होती. त्याची तिव्रता एप्रिल व मे च्या मध्यापर्यंत अधिक स्वरूपात नागरीकांना जानवली. मे महिण्याच्या मध्यपासून जिल्हयात अवकाळी पावसाने सतत हजेरी लावल्याने जिल्हयाच्या पाणी पातळीत ०.३९ मिटरने पाणी पातळीत वाढ झाली. या अवकाळी पावसामुळे सुरू असलेले टँकर बंद झाले. तर ११५ पर्यंत अधिग्रहणाची वाढलेली संख्या ८४ च्यावर आली. असे असले तरी ग्रामीण भागातील नागरीकांना अद्याप पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
जिल्हयात गेल्या १५ दिवसापासून पावसाचे सातत्य कमी होऊन प्रमाणही घटले. त्यामुळे पुन्हा १३४ गावे व वाडयांवर पाणी टंचाई जाणवत असल्याने ग्रामपंचायतींनी पंचायत समित्यांच्याकडे अधिग्रहणाची मागणी केली आहे. सदर प्रस्तावांची विस्तार अधिका-यांच्या कडून पाहणी करून तहसिल कार्यालयाकडे प्रस्तावाद्वारे अधिग्रहणाची शिफारस केली होती. तसेच तहसिल कार्यालयांनी गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याचे निदर्शनास येताच ६३ गावे व १५ तांडे, वाडयांसाठी ९० अधिग्रहणाद्वारे नागरीकांना पाणी पुरवठा होत आहे.