कोल्हापूर : प्रतिनिधी
सरकार म्हणतंय की, कर्जाचे पुनर्गठन करणार आहे. पण शेतक-यांना यंदा उत्पन्नाचा एक पैसाही मिळालेला नाही, अशा परिस्थितीत पुनर्गठन करून शेतकरी कर्ज कसा फेडणार? आमची स्पष्ट मागणी आहे की, शासनाने शेतक-यांचे पीक कर्ज शंभर टक्के सरसकट माफ करावे. दिवाळीत ५ हजार रुपयांची मदत देऊन महाराष्ट्रातील शेतक-यांची चेष्टा केली जात आहे, जे अत्यंत दुर्दैवी आहे. किमान २५ हजार रुपयांची मदत देऊन शासनाने शेतक-यांची दिवाळी गोड करावी, जेणेकरून त्यांना काहीसा दिलासा मिळेल. अशी मागणी सतेज पाटील यांनी सरकारकडे केली आहे.
सतेज पाटील म्हणाले की, राज्यात दुष्काळामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने एकीकडे शेतक-यांकडून कर्जवसुली करू नये, असे निर्देश दिले असताना, दुसरीकडे मायक्रो फायनान्स कंपन्या शेतक-यांची पिळवणूक करत आहेत. नांदेड आणि परभणीत मायक्रो फायनान्सच्या कर्जवसुलीच्या तगाद्याला कंटाळून शेतक-यांनी आपली जीवनयात्रा संपवली. या अत्यंत दुर्दैवी घटनांचे राज्यात तीव्र पडसाद उमटत असून, गोकुळच्या विजयानंतर पुण्यात आलेल्या काँग्रेस नेते तथा आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी सरसकट कर्जमाफीची आक्रमक मागणी केली.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे
सतेज पाटील म्हणाले की, मायक्रो फायनान्स कंपनीच्या त्रासामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यामुळे अशा कंपन्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. एका बाजूला सरकार सांगतंय की, बँका कर्जवसुलीसाठी दारात येणार नाहीत, मग मायक्रो फायनान्स कंपन्यांना ही सूट का? त्यांच्यावर कायदेशीर बंधने का नाहीत? असा सवाल त्यांनी केला आहे.
कृषी खात्याचे मंत्री-सहकार खात्याचे मंत्री कुठे?
सतेज पाटील म्हणाले की, आता कृषी खात्याचे मंत्री आणि सहकार खात्याचे मंत्री कुठे आहेत? त्यांचे कोणतेही विधान किंवा पंचनाम्याची माहिती समोर येत नाहीये. शासनाने सेबी आणि आरबीआयकडे याची तक्रार केली पाहिजे. ही सरकारची शेतक-यांविषयीची अनास्था स्पष्ट दर्शवते. सरकारने कर्जवसुली करू नये असे सांगितले असताना, हे वसुली करणारे थेट शेतक-यांच्या घरी कसे जातात? जर एकाही मायक्रो फायनान्स कंपनीवर कडक कारवाई झाली असती, तर इतर कंपन्यांचे असे धाडस झाले नसते.
















