मायबोलीचे हाल!

मातृभाषेचा अभिमान प्रत्येकालाच वाटत असतो. परंतु आपलेच लोक जेव्हा आपल्याच भाषेची चिरफाड करताना दिसतात तेव्हा तळपायाची आग मस्तकाला जाते. मध्यंतरी परप्रांतीय ऑटोरिक्षा चालकांना मराठी बोलता आले पाहिजे, नसता त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी गर्जना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती. परंतु आपल्याच घरात काय जळतेय ते सरनाईकांना दिसत नाही. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिग्गज गायिका आशा भोसले यांचा शोक प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला. हा शोक प्रस्ताव वाचताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठी भाषेच्या अक्षरश: चिंधड्या उडवल्या.

हा शोक प्रस्ताव वाचताना नार्वेकर यांनी अनेक चुका केल्या. त्यांना मराठीत लिहिलेले देखील नीट वाचता आले नाही. त्याबद्दल त्यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीकेची झोड उठवली. राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा व्हीडीओ शेअर करत ‘हेडमास्तरांनाच पुन्हा शाळेत घालण्याची वेळ आली’ असल्याचा टोला लगावला. रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून नार्वेकरांचा व्हीडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्या म्हणतात, मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट वाचली आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आशा दीदींच्या शोक प्रस्तावाचे भाषण ऐकले. ‘आपल्याच घरात हाल सोसते मराठी’ असं का म्हटलं जातं याचं जळजळीत वास्तव समोर आलं. विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे हेडमास्तर, पण नार्वेकरांचे भाषण ऐकून हेडमास्तरांना पुन्हा शाळेत घालण्याची वेळ आली आहे असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेले मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दाटून आल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

वाचण्याआधी त्या कागदातून त्यांनी भेळ खाल्ली होती का असा सवालही राज यांनी केला. राज पुढे म्हणाले, नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असतं कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही. अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाळ मंगेशकर असा करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते. त्यावेळी सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना दीनानाथ मंगेशकर माहीत आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहीत आहेत. भाजपने जी काही खोगीरभरती सुरू केली आहे त्यात त्यांची अवस्था ‘तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणं’ अशी झाली आहे. सभागृहात देवेंद्र फडणवीस उपस्थित होते की नाही माहीत नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल. ‘गुलाबी आँखे जो तेरी देखी’ सारखी गाणी बेसुरात म्हणणा-या फडणवीसांना आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं. पण त्यांचं म्हणणं सोपं आहे, सांगितलेली फोडाफोडीची कामं बरोबर होत आहेत ना, अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना… बस्स झालं. दीनदयाळ मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो? शोकप्रस्ताव एक उपचारच आहे, जो पार पडला.

नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्याने ब्र देखील न काढता शोक प्रस्तावाला जणू संमतीच दिली. मराठी माणसाने विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला. प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी नार्वेकरांवर निशाणा साधताना म्हटले की, नार्वेकर यांनी कितीही चुका केल्या तरी मी काहीही बोलणार नाही, नाहीतर पुन्हा माझी वकिलीची सनद रद्द होईल असा उपरोधिक टोला लगावला. राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या कायदेशीर भूमिकेवर बोट ठेवताना सरोदे म्हणाले, ते राहुल नार्वेकर आहेत, ते त्यांना वाट्टेल तेव्हा काहीही कुणाकडूनही लिहून घेतील, ते संविधानाचा अपमान करतील, ते भाषेचा अपमान करतील. त्यांचे कुणी काही बिघडवू शकत नाही. विधानसभेत राहुल नार्वेकर यांनी प्रख्यात गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडताना त्यांचे बरेच उच्चार चुकले. आशा ऐवजी ‘अशा’ म्हणाले. यथोचित ऐवजी ‘यशोचित’, ‘हृदय सिंहासना’वर ऐवजी ‘हृदया सिंहासनावर’ असा उच्चार केला. दीनानाथ मंगेशकर ऐवजी ‘दीनदयाळ’ मंगेशकर, दुर्दम्य इच्छाशक्ती ऐवजी ‘दुर्दमय इच्छाशक्ती’ असे म्हणाले.

सुमन कल्याणपूर यांच्या शोक प्रस्तावाच्या सुुरुवातीलाच ‘सुमन कल्याण पूर’ असा उल्लेख त्यांनी केला. महाराष्ट्रातील आधीच्या, आताच्या पिढ्या हे सारे पाहत आहेत. रेकॉर्ड झालेले सभापतींचे भाषण पुढच्या पिढ्या पाहतील याचे भान आणि जाणीव ठेवायला हवी होती. माणूस शिक्षित असला पाहिजे पण त्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षांना करून द्यायला हवी. या सभागृहात अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव माळवणकर लाभले, जे पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. दत्तात्रय कुंटे, अरुण गुजराथी, बाळासाहेब भारदे, दिलीप वळसे पाटील अशा अध्यक्षांची परंपरा या सभागृहाला लाभली. अशी अध्यक्षांची परंपरा कुठे आणि सध्याची ही काय अवस्था! आपल्या भाषेची गळचेपी ही हिंदी लादून केंद्राकडून सुरू आहे. ती राज्यात येणा-या परप्रांतीयांकडून सुरू आहे आणि राज्याच्या विधिमंडळाकडून पण सुरू आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर टाकून नार्वेकरांनी आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवला. त्यांच्या या वृत्तीचा मनसेने निषेध केला. ‘अमृतातेही पैजा जिंके’ असा लौकिक असलेल्या मराठी भाषेची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अक्षरश: लक्तरे काढली. ‘पद्मविभूषण’ला ‘पद्मविपुषण’ करून टाकणा-या राहुल नार्वेकरांचा निषेध करावा तितका थोडा आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Doctar Suicide|डॉ. मेहुल राठोड मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट!
02:49
Video thumbnail
Latur|पिस्तुल्या महाराजाचा पोलीस कोठडीत मुक्काम वाढला!
02:05
Video thumbnail
Nanded|पाण्यासाठी महिलांचा एल्गार; घागर घेऊन ग्रामपंचायतीवर धडक!
00:32
Video thumbnail
Nanded|महिलांची ताकद! वझरा गावात दारूबंदीचा ठराव मंजूर
00:25
Video thumbnail
Nanded|₹1.30 कोटींचा बंधारा... पण लाथ मारताच कोसळला?
02:50
Video thumbnail
Latur|सावकाराने जमीन हडपल्याचा आरोप; शेतकऱ्याचे आमरण उपोषण
04:42
Video thumbnail
Latur|गटप्रवर्तक महिलांचे आशाताई भिसे यांना साकडे
06:36
Video thumbnail
Breaking News|लातुरातील नामांकित डॉक्टरची आत्महत्या! घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल
01:59
Video thumbnail
Big Breaking|धक्कादायक! लातूरचे नामांकित डॉक्टर मेहुल राठोड यांची आत्महत्या
00:30
Video thumbnail
Latur|ग्रामीण आरोग्य व्यवस्था धोक्यात? आशाताई भिसे आक्रमक
04:17
Video thumbnail
Latur|अंजली नगरातील आगग्रस्त घराची आमदार अमित देशमुख यांनी केली पाहणी
04:41
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16
Video thumbnail
BIG BREAKING : ₹2 लाख कर्जमाफी! परभणीत जल्लोषाचा माहोल
02:06
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03

Latest news