मालेगाव : प्रतिनिधी
राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार १५ जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर होती. दरम्यान ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सुरुवात झाली असून, मालेगावातून मोठी बातमी समोर आली आहे. मालेगावात इस्लाम पार्टीने खाते उघडले आहे.
प्रभाग क्रमांक ०६ (क) मधून इस्लाम पार्टीच्या मुनीरा शेख फकीर मोहम्मद यांची बिनविरोध निवड झाली आहे. समोरच्या उमेदवाराने अर्ज माघारी घेतल्याने मुनीरा शेख फकीर मोहम्मद यांचा बिनविरोध विजय झाला आहे. मालेगावात इस्लाम पार्टीचा हा पहिलाच बिनविरोध विजय ठरला आहे. या विजयानंतर इस्लाम पार्टीचे अध्यक्ष, माजी आमदार आसिफ शेख यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे.

