27 C
Latur
Friday, March 6, 2026
Homeमहाराष्ट्रमिनी मंत्रालयावर सत्ता कोणाची? सोमवारी फैसला

मिनी मंत्रालयावर सत्ता कोणाची? सोमवारी फैसला

१२ जिल्हा परिषद, १२५ पंचायत समिती निवडणूक, निकालाची उत्सुकता
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणा-या १२५ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शनिवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले. त्यानंतर सर्व उमदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. आता सोमवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असून, मिनी मंत्रालयावर नेमका कोणाचा झेंडा फडकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत ग्रामीण भागात चुरशीच्या लढती झाल्या आहेत.

राज्यातील १२ जिल्ह्यांतील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितींच्या निवडणुकीत काल अंदाजे ६० ते ६२ टक्के मतदान झाले. राजकीय कार्यकर्त्यांमधील बाचाबाची, स्थानिक प्रश्नांसाठी गावक-यांनी मतदानावर टाकलेल्या बहिष्काराच्या घटना वगळता मतदान सर्वत्र उत्साहात; पण शांततेत पार पडले आणि जिल्हा परिषदेच्या ७३१ तर पंचायत समितीच्या १ हजार ४६२ जागांसाठीच्या या निवडणुकीत ७ हजार ४३८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. आता उद्या सोमवारी मतमोजणी होऊन दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
राज्यात या अगोदर सुरुवातीला नगर परिषदा, नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर महापालिकांच्या निवडणुका झाल्या. या दोन्ही निवडणुकांत महायुतीने बाजी मारली. त्यानंतर राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितींची निवडणूक पार पडली. त्यासाठी शनिवारी मतदान पार पडले. या निवडणुकाही अत्यंत चुरशीच्या झाल्या. शहर भागातील निवडणुकांपेक्षा ग्रामीण भागातील निवडणुकांचे वेगळे चित्र असून, या भागाचे प्रश्न वेगळे आहेत. त्यामुळे या निवडणुका वेगळ््या मुद्यावर लढल्या गेल्या आहेत.

या निमित्ताने गाव पातळीवर आरोप-प्रत्यारोप झाले असले तरी ग्रामीण भागातील स्थानिक प्रश्नांवरून निवडणुकीचा कल पाहिला जातो. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातील गावांमध्ये वेगवेगळे प्रश्न आणि भूमिका समोर आल्याने ग्रामीण भागातील जनतेचा कौल नेमका कोणाला मिळतो, हे निकालातूनच स्पष्ट होणार आहे.

या जिल्ह्यांत झाली निवडणूक
पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर आणि कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदांसाठी ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

लातूर जिल्ह्यात ५९ गट,
११८ गणांसाठी निवडणूक
लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ५९ गट आणि पंचायत समितीच्या ११८ गणांसाठी शनिवारी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत जिल्ह्यात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकांत जिल्हा परिषदेच्या ५९ गटांत २४२ उमेदवार आणि १० पंचायत समितीच्या ११८ गणांसाठी ४१९ उमेदवार मैदानात होते. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (दि. ९) असल्याने या उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR