मिरज : प्रतिनिधी
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात क्राईमच्या घटना घडत आहेत. अशातच आता मिरजमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्याने संपूर्ण मिरज शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिरज शहरात दोन लहान मुलांची प्रत्येकी २० हजार रुपये दराने एकूण ४० हजार रुपयांमध्ये बेकायदेशीररीत्या दत्तक म्हणून विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कक्षाला मिळाल्यानंतर ही घटना समोर आली. त्यानंतर त्यांनी तातडीने चौकशी सुरू करण्यास सुरुवात केली आहे.
प्राथमिक तपासात सुभाषनगर परिसरात राहणा-या मनीषा जाधव हिने दोन पुरुष बालके ४० हजार रुपयांमध्ये दत्तक म्हणून दिल्याचे निष्पन्न झाले. कोणतीही कायदेशीर दत्तक प्रक्रिया न राबवता थेट पैशांच्या मोबदल्यात बालकांची विक्री केल्याचा आरोप आहे. तिच्याकडून सचिन लोंढे, सुरेखा आणि सचिन गोसावी यांनी ही दोन्ही बालके दत्तक घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे यांनी मिरज शहर पोलिस ठाणे येथे या चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार संबंधितांविरुद्ध अल्पवयीन न्याय या अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

